साने गुरुजी विद्या मंदिरात शिक्षकांच्या निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाला प्रारंभ

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्यवृद्धीसह शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित दहा दिवसीय निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण वर्गाला शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) शहरातील साने गुरुजी विद्या मंदिरात प्रारंभ झाला. १३ ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या प्रशिक्षणात शिक्षकांना विविध शैक्षणिक विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

या प्रशिक्षण वर्गाला गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांनी अद्ययावत शैक्षणिक तंत्रज्ञान आणि ज्ञानाचा लाभ घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वी नियोजनासाठी समन्वयक म्हणून किरण शिसोदे, तर सहसमन्वयक व विषयतज्ज्ञ म्हणून तुषार बाविस्कर, देवेंद्र पाटील, प्रशांत पाटील आणि किशोर पाटील जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी आनंदा बापू धनगर, सर्जेराव शिसोदे, सोपान भवरे आणि रवींद्र देवरे यांच्यासह इतर तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करीत आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्यांना चालना मिळून सेवांतर्गत विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *