
रक्तदानातून जपली माणुसकीची वीण; विश्व बंधुत्व दिनी अमळनेरात रक्तदान शिबिर
अमळनेर (प्रतिनिधी) : राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १९व्या पुण्यतिथीनिमित्त आणि विश्व बंधुत्व दिवसाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, अमळनेर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश दिला.
ओम शांती केंद्राच्या रंजू दीदी, वैष्णवी दीदी, सुषमा पाटील, अविनाश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह अनेकांनी यावेळी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
केंद्र प्रमुख विद्यादीदी यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट करताना प्रत्येक व्यक्तीने रक्तदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे सांगितले. रक्तदानामुळे रक्ताभिसरणास मदत होऊन शरीर निरोगी ठेवण्यास हातभार लागतो. त्याचबरोबर आपल्या रक्तामुळे गरजू रुग्णाचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, या माध्यमातून माणसे जोडली जातात, असे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्र प्रमुख विद्यादीदी, अॅड. तिलोत्तमा पाटील आणि ब्लड बँकेचे संचालक जितेंद्र पाटील उपस्थित होते. विश्व बंधुत्व दिवसाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासोबतच समाजात सेवाभाव आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी दिलीप पाटील, आरती दीदी आणि हरचंद लांडगे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply