अवैध वाळू वाहतुकीवर मारवड पोलिसांचा दणका; दोन ट्रॅक्टरसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) : पांझरा नदीपात्रातून तसेच मारवड परिसरातून अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर मारवड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर व वाळूसह एकूण ७ लाख ४८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मारवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी, पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, शरीफ पठाण आणि राजेंद्र पाटील हे २३ ऑगस्ट रोजी सकाळी मांडळ परिसरात गस्त घालत असताना पांझरा नदीतून ट्रॅक्टरद्वारे सुमारे दीड ब्रास वाळूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेत कारवाई केली. या प्रकरणी पुंडलिक सुभाष कोळी (वय २३), सुनील भिल आणि रवी कोळी, सर्व रा. मांडळ यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३०५(ई), ३०३(२), ३(५), जमीन महसूल कायदा कलम ४८ तसेच मोटार वाहन कायदा कलम ३(१), १८१, ६६(१), १९२(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत ट्रॅक्टर व वाळूसह ४ लाख ८६ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी मारवड–धानोरा रस्त्यावरही अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला. या प्रकरणी करणखेडा येथील भावेश रविंद्र सूर्यवंशी (वय २२) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३०५, ३०३(२), जमीन महसूल अधिनियम कलम ४८ आणि मोटार वाहन अधिनियम कलम ३(१), १८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडील ट्रॅक्टर व वाळूसह २ लाख ६२ हजार ११५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास एएसआय संजय पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *