
बनावट गुंठेवारी प्रकरणात बी-फायनल अहवाल रद्द; अमळनेर न्यायालयाचे पुन्हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) बनावट गुंठेवारी करून अतिक्रमण वाचवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या प्रकरणात अमळनेर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत पोलिसांनी दाखल केलेला बी-फायनल (गुन्हा रद्द) अहवाल रद्द केला असून संबंधितांवर पुन्हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात नगरसेवक मोहन सातपुते यांच्यासह अनेक तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगरसेवक मोहन सातपुते यांनी सिटी सर्व्हे ३२२३/ ब / १ मधील प्लॉट नंबर १८ चे बांधकाम करताना राजकुमार छाजेड यांच्या प्लॉट नंबर २० मध्ये ५०० चौरस फूट अतिक्रमण केले. अतिक्रमण काढू नये म्हणून बनावट गुंठेवारी व कागदपत्रे तयार करून त्याठिकाणी बेकायदेशीर रस्ता टाकण्याचा ठराव १३ मे २००३ साली करण्यात आला होता. असा आरोप करत राजकुमार छाजेड यांनी २०१३ मध्ये अमळनेर पोलीस स्टेशनला भादवि ४२०, ४६८ ,४७१ , ३४ प्रमाणे संशयित आरोपी तत्कालीन प्रांतधिकारी निलेश सागर, तहसीलदार माया सोनवणे, मुख्याधिकारी पी.जी. सोनवणे, नपा अभियंता विजय शिंदे व सुदाम जगताप, मुख्य लिपिक सी.डी. महाजन, मंडळाधिकारी भावसार व शहर तलाठी, तत्कालीन नगराध्यक्ष सुरेश ललवाणी, नगरसेवक मोहन सातपुतेसह दीपक भावसार, नामदेव पाटील, उषा धनगर, लालचन्द सैनानी, योगेश सुहागीर, सुनंदा पाटील, संदीप घोरपडे, नरेंद्र संदानशिव, साहेबराव पारधी, सलीम टोपी, चंदूसिंग परदेशी, कैलास भावसार, रामदास शेलकर, पांडुरंग माळी, साहेबराव पवार, मंगला भोसले, भारती गाला, मुन्ना शर्मा, सुभाष अग्रवाल, सुशीला चौधरी,मीना चौधरी,रामदास निकुंभ, अली असगर बोहरी विष्णुदास सैनानी, वास्तुविशारद नंदकुमार भांडारकर आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात २०१८ साली तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी बी फायनल (गुन्हा रद्द) चा अहवाल तयार केला होता. मात्र हे प्रकरण न्यायालयात पाठवण्यात आले नव्हते. २०२३ मध्ये हा अहवाल न्यायालयात पाठवण्यात आला होता. या बी फायनल विरोधात राजकुमार छाजेड यांनी अमळनेर येथील न्यायालयात प्रोटेस्ट याचिका दाखल केली होती. प्रथम वर्ग न्या. निलेश यलमाणे यांनी पोलिसांचा बी फायनल (गुन्हा रद्द) चा अहवाल रद्द करत पुन्हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान यातील काही जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण सेवानिवृत्त झाले आहेत.

Leave a Reply