
बोरी नदी पुलावरील अतिक्रमण हटवले; वाहतूक सुरळीत, नागरिकांमध्ये समाधान
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील बोरी नदी पुलावर गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेल्या अतिक्रमणावर अखेर पालिकेने कारवाई करत हातगाड्या व विक्रेत्यांना हटवले आहे. या कारवाईनंतर पुलावरील वाहतूक सुरळीत झाली असून प्रवासी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्य मार्ग क्रमांक ६ व १५ वरील या पुलावर भाजीपाला, फळे, मासे, कांदा-लसूण विक्रेत्यांनी हातगाड्या व वाहने उभी करून अक्षरशः बाजारपेठ उभारली होती. यामुळे पुलावर सतत वाहतूक कोंडी होत होती. अनेक ग्राहक थेट पुलावरच वाहने थांबवून खरेदी करत असल्याने मागील वाहनांना मोठा विलंब होत होता. काहीजण तर चारचाकी वाहनातूनच खरेदी करत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. या अतिक्रमणामुळे अपघातांची शक्यता वाढली होती. काही अपघातांमध्ये दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. विशेष म्हणजे पोलीस, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत होती. काही नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पाठींब्यामुळे अतिक्रमणधारक अधिकच बिनधास्त झाल्याचेही बोलले जात होते. दरम्यान, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार ३० मार्च रोजी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत पुलावरील सुमारे १५ हातगाड्या तसेच दोन मासे विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले. या मोहिमेत अतिक्रमण विभागाचे प्रमुख राध्येश्याम अग्रवाल, अविनाश बिऱ्हाडे, विकास सपकाळे, बुद्धभूषण चव्हाण व शांताराम संदानशिव यांनी सहभाग घेतला. संबंधित विक्रेत्यांना प्रथम सक्त ताकीद देण्यात आली असून यापुढे पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे पुलावरील वाहतूक मोकळी झाली असून नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

Leave a Reply