
नगाव बुद्रुक येथे वृक्षारोपण; ‘एक झाड – अनेक श्वास’चा दिला संदेश
हिंदुसूर्य प्रतिष्ठानचा पुढाकार; वन विभागाचे अधिकारी व ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती

अमळनेर (प्रतिनिधी )नगाव बुद्रुक येथे पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीचे महत्त्व जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने नगाव बुद्रुक गावात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. “एक झाड – अनेक श्वास” या संकल्पनेतून गाव परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे नियमित संगोपन करून ती जगविण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला. हिंदुसूर्य प्रतिष्ठान तसेच वन विभागाच्या संयुक्त सहभागातून आयोजित या उपक्रमाला वन क्षेत्र अधिकारी तथा वनपाल श्रीमती सुनिता धनगर, वनरक्षक श्रीमती अलका पाटील, वनरक्षक जगदीश ठाकरे व भटू पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गावातील ग्रामस्थांनीही या पर्यावरणपूरक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल लक्षात घेता अधिकाधिक वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवेगार आणि निरोगी पर्यावरण निर्माण करता येईल, असा संदेश यावेळी देण्यात आला. हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण नंदकुमार पाटील आणि जगदीश विजय पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकाराला वन विभाग, हिंदुसूर्य प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या माध्यमातून “झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा” असा संदेश देत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply