
दहिवद शिवारात बोअरवेलच्या कॉपर वायरची चोरी; ऐन दुष्काळात १३ शेतकऱ्यांना फटका
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद शिवारात शेतातील बोअरवेलच्या वीजपंपांना जोडलेल्या कॉपर वायर चोरीला गेल्याची घटना १० ते ११ नोव्हेंबरदरम्यान उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने तब्बल १३ शेतकऱ्यांच्या शेतातील २३ हजार ८८० रुपये किमतीच्या वायरी चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दहिवद येथील सुभाष भगवान माळी यांनी गावातील सुरेश शेनफडू माळी यांची गट क्रमांक ६४८/२ मधील शेती निम्मे बटाईने कसण्यासाठी घेतली आहे. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेतात पाणी देऊन ते घरी आले होते. दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता पुन्हा शेतात पाणी देण्यासाठी गेले असता बोअरवेलपासून स्टार्टरपर्यंत जोडलेली १५० फूट लांबीची, चार हजार ५०० रुपये किमतीची कॉपर वायर चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर त्यांनी आजूबाजूच्या शेतांमध्ये चौकशी केली असता राजेंद्र बबनराव पाटील, महेंद्र मधुकर पाटील, आधार सुकलाल माळी, जगदीश बारीकराव पाटील, सोमा लुकडू माळी, जयेश कैलास पाटील, जिजाबरव पांडुरंग पाटील, अलका संजय पाटील, सूर्यकांत मधुकर पाटील, पुष्पांबाई चिमणराव पाटील, संगीताबाई सुधाकर पाटील आणि विजय प्रकाश पाटील यांच्या शेतातील वायरीही चोरीला गेल्याचे समोर आले. अशा एकूण १३ शेतकऱ्यांच्या शेतातील २३ हजार ८८० रुपये किमतीच्या कॉपर वायरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्या आहेत. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.

Leave a Reply