नवरात्रोत्सव मंडळांना प्रीपेड स्मार्ट मीटरद्वारे अधिकृत वीज वापर बंधनकारक; ४८ तासांत तात्पुरती वीजजोडणी

अमळनेर (प्रतिनिधी) नवरात्रोत्सव व दुर्गापूजेसाठी तात्पुरती वीजजोडणी घेणाऱ्या मंडळांना यंदा प्रीपेड स्मार्ट मीटरद्वारे अधिकृत वीज वापरावा लागणार आहे. मोबाइल रिचार्जप्रमाणे आधी रक्कम भरून वीज वापरता येणार असून, ऑनलाइन अर्ज पूर्ण झाल्यानंतर ४८ तासांच्या आत तात्पुरती वीजजोडणी देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

दुर्गापूजा व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती वीजजोडणी मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. मंडळे व ग्राहकांनी महावितरणच्या संकेतस्थळावर अथवा मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज करावा. गतवर्षी अमळनेर शहर व तालुक्यात जवळपास ८० हून अधिक नवरात्रोत्सव व दुर्गापूजा मंडपांना तात्पुरता वीजपुरवठा करण्यात आला होता. यंदाही उत्सव काळात वीजपुरवठ्याबाबत उद्भवणाऱ्या अडचणींवर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात येणार आहेत.

 

अनधिकृत जोडणी धोकादायक

 

अनधिकृत वीजजोडणी, सदोष वायरिंग तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्युत भाराचा वापर जीवित व वित्तहानीस कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे मंडळांनी महावितरणकडून अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घेऊनच विद्युत रोषणाई करावी. सुरक्षित वीज वापराचे नियम पाळून वीजचोरी टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेणे आवश्यक

 

“नवरात्रोत्सवासाठी घरगुती दराने वीजपुरवठा केला जाणार असला, तरी तात्पुरत्या वीजजोडणीसाठी आकारण्यात येणारे दर स्वस्त राहणार आहेत. मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विद्युत रोषणाई करावी.” ज्ञानेश्वर अंबाडकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, अमळनेर, महावितरण भाग १

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *