विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये दमदार पंच; चैताली पाटील, तेजल पाटील यांना रौप्यपदक

अमळनेर (प्रतिनिधी) : शिरपूर येथे झालेल्या नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल, अमळनेर येथील चैताली पाटील आणि तेजल पाटील या दोन विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. अवघ्या एका महिन्याच्या प्रशिक्षणाच्या जोरावर दोन्ही विद्यार्थिनींनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्पर्धेत चमकदार कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल केले.

किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर, जि. धुळे आणि धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धा २०२६ चे आयोजन ३० ऑगस्ट रोजी शिरपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला. सायारदेवी बोहरा सेंट्रल स्कूलच्या चैताली पाटील हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक मिळविले. तिच्या प्रभावी कामगिरीबद्दल तिला ‘बेस्ट लूझर’ हा सन्माननीय पुरस्कारही प्रदान करण्यात आला. तेजल पाटील हिनेही स्पर्धेत दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. तिच्या उत्कृष्ट खेळाची दखल घेत तिला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही विद्यार्थिनींनी केवळ एका महिन्याच्या प्रशिक्षणात विभागीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. कमी कालावधीत कठोर सराव, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. दोन्ही विद्यार्थिनींच्या यशाबद्दल सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शकांचे आणि मुख्यध्यापक जितेंद्रसिंह व प्रशिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थिनींनी भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे आणि अमळनेरचे नाव उंचवावे, अशा शुभेच्छा मुख्याध्यापकांनी दिल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *