
जेईई ऑनलाईन क्लासच्या नावाखाली अमळनेरच्या महिलेला २२.७५ लाखांचा गंडा; पाच जणांविरुद्ध सायबर गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) मुलीच्या जेईई ऑनलाईन शिक्षणासाठी प्रवेश घेण्याच्या बहाण्याने अमळनेर येथील एका महिलेकडून तब्बल २२ लाख ७५ हजार १३७ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांसह संबंधित लिंक चालवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २९ ऑक्टोबर २०२४ ते २ जून २०२६ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, राजाराम नगर येथील ज्योती विनोद सोनार यांच्या मुलीसाठी जेईई ऑनलाईन बाय ज्यू क्लास साठी आणि नोट साठीची माहिती देत सचिन राठोड यांनी संपर्क साधला. त्यानंतर ऑनलाईन मिटिंग घेऊन प्रवेशासाठी १ लाख ९ हजार ५०० रुपये भरून घेतले. उर्वरित शुल्क हप्त्यांमध्ये भरण्याचे सांगत शरद पवार यांनी दुसऱ्या विद्यार्थ्याचा आयडी वापरून क्लास जॉईन करण्यास सांगितले. मात्र वर्ग नियमित होत नसल्याने व नोट्सही न मिळाल्याने संशय निर्माण झाला.
दरम्यान, गणेश कुमार मीना याने स्वतःला अधिकारी असल्याचे भासवून पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याने वर्दीतील फोटो व ओळखपत्र पाठवून विश्वास संपादन केला. त्यानंतर अनुज कुमार, प्रदीप कुमार मीना व इतरांनी खाते अपडेट, खाते बदल आदी कारणे सांगत विविध मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधून फोन-पेद्वारे २१ लाख ६५ हजार ६३७ रुपये उकळले. एकूण २२ लाख ७५ हजार १३७ रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने जळगाव सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ड) अन्वये पाच जणांसह संबंधित लिंक चालवणाऱ्या आकाश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.

Leave a Reply