
अमळनेरमध्ये अवैध गुटखा विक्रीवर कारवाई; पान सेंटर चालकाविरुद्ध गुन्हा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील साने नगर परिसरात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या पान सेंटरवर अन्न सुरक्षा विभागाने धाड टाकत कारवाई केली असून संबंधित विक्रेत्याविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, साने नगर तांबेपुरा येथील मातृछाया पान सेंटरवर अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे यांनी दि. २१ रोजी छापा टाकला. या छाप्यात बळवंत भगवान पाटील याच्या ताब्यात राज्यात बंदी असलेला विविध कंपन्यांचा गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळून आला. कारवाईदरम्यान सुमारे ३ हजार ९११ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही तो खुलेआम विक्रीस ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ मुद्देमाल जप्त करून संबंधित विक्रेत्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी बळवंत भगवान पाटील (रा. साने नगर, तांबेपुरा) याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत. दरम्यान, अन्न सुरक्षा विभागाकडून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Leave a Reply