पुराच्या संकटात कळमसरेकरांना मदतीचा हात; ८५ कुटुंबांना जीवनावश्यक किराणा किटचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळमसरे येथे ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या ८५ लाभार्थ्यांना १ सप्टेंबर रोजी जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा किटचे वाटप करण्यात आले. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने भूतनगर, माधवपुरा आदी भागांतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर बाधित कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.

कळमसरे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या वाटप कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे उपसरपंच पिंटू राजपूत, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन अशोक हिलाल चौधरी, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन व पत्रकार बाबुलाल पाटील, तलाठी भूषण पाटील, सचिन बमनाथ, विक्रांत पाटील, पोलीस पाटील गोपाल माळी, लिपिक प्रदिप महाजन, संजय भिल, भागवत कोळी आणि कोतवाल आधार सोनवणे उपस्थित होते. ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कळमसरे परिसरातील भूतनगर, माधवपुरा यांसह विविध भागांमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे घरातील जीवनावश्यक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुरानंतर बाधित नागरिकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी किराणा किटच्या माध्यमातून मदत करण्यात आली. या मदतकार्याला मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री व आमदार अनिल दादा पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, ग्रामविकास अधिकारी नितीन पाटील आणि तलाठी भूषण पाटील यांचे सहकार्य लाभले. पुरामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्याने बाधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *