डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प करा; एकही गुन्हा दाखल होऊ देऊ नका : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे

अमळनेर (प्रतिनिधी) : गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे. मात्र उत्सवादरम्यान क्षुल्लक कारणांवरून तरुणांवर गुन्हे दाखल होतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या भविष्यातील अनेक संधींचे दरवाजे बंद होतात. त्यामुळे यंदा अमळनेर शहरात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करा आणि एकही गुन्हा दाखल होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाणी मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक झाली. यावेळी श्रीकांत धिवरे बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे हा उत्सव संस्कृतीपूर्वक आणि शांततेत साजरा झाला पाहिजे. उत्सवाचे विकृतीकरण न होता संस्कृतीकरण व्हावे, ही शासनाची इच्छा आहे. अमळनेर पोलीस विभागाने गणेशोत्सवासाठी परिपूर्ण तयारी केली असून यंदाही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हा बंदोबस्त नागरिकांच्या आणि गावाच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामागे कोणताही दुसरा हेतू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान एकच गुन्हा दाखल झाला होता. यंदा एकही गुन्हा दाखल होणार नाही, असा संकल्प सर्वांनी करावा. हे गाव आणि शहर आपले आहे, त्यामुळे ते शांत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव काळात यापूर्वी काही आकस्मिक घटना घडल्या असून त्यात काही जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे उत्सवादरम्यान दारूचे सेवन टाळावे, असे त्यांनी सांगितले. गणपती विक्रीच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची मंडळांनी व संबंधितांनी काळजी घ्यावी. गणेशमूर्ती स्थापनेपूर्वी मूर्ती आणण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी. स्थापना ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, रात्री सुरक्षेसाठी एखादा कार्यकर्ता तेथे उपस्थित ठेवावा आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

इतर धर्मीयांच्या भावना दुखावतील किंवा आक्षेपार्ह ठरतील, असे संदेश सामाजिक माध्यमांवर प्रसारित करू नका, असेही श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या कानबाई उत्सवात काही जणांनी कपडे काढून ट्रकवर नाचणे तसेच इतर वाहनांवर पाणी उडविणे असे प्रकार केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. गणेशोत्सवात अशा प्रकारांची पुनरावृत्ती करू नका, अशी विनंतीवजा तंबीही त्यांनी दिली. बैठकीत चेतन राजपूत, प्रविण पाटील, दिनेश शेलकर, नितीन भदाणे, विक्रांत पाटील, शकील काझी, रणजित शिंदे यांच्यासह उपस्थितांनी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत मते मांडली. शहरातील वाहतूक, मिरवणुकीचे मार्ग, वीज व्यवस्था, स्वच्छता, विसर्जन व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्ताबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला शांतता समितीचे सदस्य, आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील, गणेश मंडळांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार  पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मानले.

 

अमळनेर हद्दीत १४८, तर मारवडमध्ये ३७ मंडळांचे विसर्जन

 

डीवायएसपी विनायक कोते यांनी गणेश विसर्जनाच्या नियोजनाची माहिती दिली. अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४८, तर मारवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३७ गणेश मंडळांचे विसर्जन होणार आहे. अमळनेर तालुक्यात पाचवा, सातवा, नववा आणि अकरावा दिवस अशा विविध दिवशी गणेश विसर्जनाची परंपरा आहे. त्यानुसार पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत असल्याचे विनायक कोते यांनी सांगितले.

उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. पारंपरिक वाद्यांचा वापर करावा आणि मोठ्या आवाजातील डीजेचा वापर टाळावा, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नगरपरिषदेच्या वतीने गणेशोत्सव तसेच आगामी गोगा नवमीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. गणेश विसर्जनाच्या मार्गावरील तसेच गोगा नवमीच्या मुख्य रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

पत्रकार संघाच्या स्वागत मंचाच्या उपक्रमाचे कौतुक

 

गेल्या तीन वर्षांपासून गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी दगडी दरवाजाजवळ अमळनेर पत्रकार संघाच्या वतीने स्वागत मंच उभारून प्रशासनाला सहकार्य केले जात आहे. यंदाही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी दिली. या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कौतुक केले तसेच त्यास परवानगीही दिली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *