
अमळनेर तालुक्यात ३७ तीव्र, २१४ मध्यम कुपोषित बालके आढळली
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात जून २०२६ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ३७ तीव्र कुपोषित आणि २१४ मध्यम कुपोषित बालके आढळून आली आहेत. ही बाब चिंताजनक असली तरी या बालकांना वेळेवर उपचार, पोषण आहार आणि नियमित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बालविकास विभाग तसेच आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, तालुक्यातील अंगणवाड्यांमधून कुपोषित बालकांची ओळख करून त्यांची नियमित वजन, उंची आणि आरोग्य तपासणी केली जात आहे. कुपोषणाची तीव्रता लक्षात घेऊन बालकांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. तीव्र कुपोषित बालकांना आवश्यकतेनुसार पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. याशिवाय त्यांना विशेष पोषण आहार उपलब्ध करून दिला जात आहे. मध्यम कुपोषित बालकांसाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून त्यांच्या पालकांना सकस आहार, स्तनपानाचे महत्त्व, पूरक आहार आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
कुपोषणमुक्त अमळनेरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन बालकांच्या आरोग्याची माहिती घेतली जात आहे. बालकांच्या वाढीची नियमित नोंद ठेवून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपचार आणि पोषण सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रशासनाने कुपोषित बालकांच्या कुटुंबांमध्ये पोषणविषयक जनजागृतीवरही भर दिला असून संतुलित आहार, स्वच्छता आणि बालसंगोपनाबाबत सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे. संबंधित विभागांच्या समन्वयातून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पोषण आहारावर विशेष भर
“कुपोषित बालकांची नियमित आरोग्य तपासणी, वजन नोंदणी आणि पोषण आहारावर विशेष भर दिला जात आहे. तीव्र कुपोषित बालकांना तातडीने उपचार व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून, पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृतीही केली जात आहे. कुपोषणमुक्त अमळनेरसाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत.”
– प्रमिला पाटील, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी

Leave a Reply