दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर अमळनेर पोलिसांची धडक कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) गांधीपुरा परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याच्या तक्रारी असलेल्या सराईत गुन्हेगार राजेश एकनाथ निकुंभ (उर्फ दादू धोबी) याच्यावर अमळनेर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी धडक कारवाई केली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला राहत्या घरातून ताब्यात घेत गांधीपुरा पोलीस चौकीपर्यंत पायी आणले. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, राजेश एकनाथ निकुंभ याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामिनावर बाहेर असूनही गांधीपुरा परिसरात चाकूचा धाक दाखवणे, नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे तसेच लूटमारीचे प्रकार केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शुक्रवारी सकाळी सुमारे अकरा वाजता पोलीस पथकासह त्याच्या राहत्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला गांधीपुरा पोलीस चौकीत आणून सखोल तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान त्याच्याकडे कोणतेही हत्यार आढळून आले नाही. त्यानंतर त्याला कायद्याचे पालन करण्याचा कडक इशारा देत समज देण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमळनेर पोलीस कठोर भूमिका घेत असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून दिला गेला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *