
घरमालक गावाला गेले अन् चोरट्यांनी साधला डाव; तीन लाखांचे दागिने लंपास
अमळनेर (प्रतिनिधी) घरमालक कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल २ लाख ९९ हजार ४५० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना स्वामी नारायण मंदिरासमोरील म्हस्कर प्लॉट येथे १ ऑगस्ट रोजी दुपारपासून २ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोकेश अर्जुनदास जीवनानी यांचा कापड व्यवसाय आहे. १ ऑगस्ट रोजी त्यांची पत्नी व आई सिंधी कॉलनीतील भावाच्या घरी गेल्या होत्या. त्यानंतर लोकेश जीवनानी आणि त्यांचा मुलगाही दुकानावर गेले. सायंकाळी दुकान बंद केल्यानंतर ते दोघेही भावाच्या घरी गेले होते. त्यामुळे घर बंद असल्याची संधी चोरट्यांना मिळाली. २ ऑगस्ट रोजी दुपारी लोकेश जीवनानी म्हस्कर प्लॉटमधील घरी परतले असता घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर कपडे व घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. घराची पाहणी केली असता सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्यांनी ५६ हजार ५०० रुपये किमतीचा १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस सेट व कानातील टॉप्स, १ लाख ५८ हजार २०० रुपये किमतीच्या २८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, २८ हजार २५० रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि ५६ हजार ५०० रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, असा एकूण २ लाख ९९ हजार ४५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी लोकेश अर्जुनदास जीवनानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशाने उपनिरीक्षक समाधान गायकवाड आणि मयुर पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पुढील तपास उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.

Leave a Reply