
अमळनेरच्या जितेंद्र धर्मराज सूर्यवंशी यांना केंद्र शासनाचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’
अमळनेर (प्रतिनिधी) : पोलीस सेवेत कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तांत्रिक तपासातील विशेष कौशल्याच्या जोरावर अमळनेरचे सुपुत्र पोलीस हवालदार जितेंद्र धर्मराज सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याची छाप उमटवली आहे.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट व दीर्घकालीन सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अतिउत्कृष्ट’ आणि ‘उत्कृष्ट’ सेवा पदके जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जितेंद्र धर्मराज सूर्यवंशी यांना ‘उत्कृष्ट’ सेवा पदक जाहीर झाल्याने अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मु.पो. मुडी प्र. डांगरी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक धर्मराज सूर्यवंशी यांचे सुपुत्र तसेच माध्यमिक शिक्षक वसंत सूर्यवंशी आणि प्राथमिक शिक्षक अनंत सूर्यवंशी यांचे कनिष्ठ बंधू असलेले पोलीस हवालदार जितेंद्र सूर्यवंशी यांनी मुडी, पिळोदा आणि अमळनेर येथील शाळा व महाविद्यालयात प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत आपल्या कारकिर्दीला आकार दिला. सन २००५ मध्ये बृहन्मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून त्यांच्या पोलीस कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर पोलीस मुख्यालय, पोलीस ठाणे तसेच विविध विशेष शाखांमध्ये त्यांनी पोलीस सेवेतील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. आरोपींचा माग काढणे, गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तांत्रिक तपास करणे तसेच तपास प्रक्रियेत तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर करणे, यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि तांत्रिक तपासातील विशेष कौशल्यामुळे जितेंद्र सूर्यवंशी यांनी पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या आजवरच्या सेवाप्रवासात मेहनत, जिद्द आणि कर्तव्यनिष्ठेचा ठसा उमटला असून, केंद्र शासनाकडून जाहीर झालेले ‘उत्कृष्ट’ सेवा पदक त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल मानली जात आहे.
जितेंद्र धर्मराज सूर्यवंशी यांच्या या उल्लेखनीय सन्मानाबद्दल त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच पोलीस वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमळनेरच्या भूमीतून पोलीस सेवेत दाखल होऊन आपल्या कार्यकौशल्याच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळविणाऱ्या जितेंद्र सूर्यवंशी यांच्या कामगिरीचा अमळनेरकरांना विशेष अभिमान व्यक्त होत आहे.

Leave a Reply