डॉक्टर साहेब, आधी नगरपालिकेचे हॉस्पिटल व्यवस्थित सांभाळा, मग दुसरे हॉस्पिटल काढा!

पाणी गायब, कचऱ्याचे ढीग अन् डासांचे साम्राज्य; ‘लाडकी बहीण हॉस्पिटल’च्या घोषणेवर अमळनेरकरांचा सवाल

 

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. एकीकडे अमळनेरकरांना मूलभूत नागरी सुविधा मिळत नसताना दुसरीकडे नव्या योजनांच्या घोषणा घोषणांचा पाऊस पाडला जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः डॉक्टर असलेल्या नगराध्यक्षांनी शहरातील विद्यमान समस्या सोडविण्याऐवजी ‘लाडकी बहीण हॉस्पिटल’ उभारण्याची घोषणा केल्याने नागरिकांनी आता थेट सवाल उपस्थित केला आहे. “डॉक्टर साहेब, जे नगरपालिकेचे हॉस्पिटल आहे ते आधी व्यवस्थित सांभाळा, मग दुसरे हॉस्पिटल काढा !”

अमळनेर शहरातील सध्याचा पालिकेचा दवाखाना आधी व्यवस्थित चालविण्याची गरज असताना नवीन हॉस्पिटलची घोषणा करण्यामागचा नेमका उद्देश काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पालिकेचा विद्यमान दवाखाना जेमतेम सुरू असून, तेथे पुरेशा सुविधा, आवश्यक साधने आणि चांगल्या आरोग्यसेवेची उपलब्धता निर्माण करण्याची गरज आहे. आधी अस्तित्वात असलेल्या हॉस्पिटलमध्ये नागरिकांना दर्जेदार सुविधा द्याव्यात, त्याचे व्यवस्थापन सक्षम करावे आणि त्यानंतरच दुसऱ्या हॉस्पिटलचा विचार करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

अमळनेरकरांना आता घोषणांचा पाऊस नको; नळातून पाणी, रस्त्यावर स्वच्छता आणि पालिकेच्या दवाखान्यात प्रत्यक्ष आरोग्यसेवा हवी आहे. घोषणांपेक्षा कृतीतून कर्तृत्व सिद्ध करा, अशीच शहरवासीयांची अपेक्षा आहे.

 

“इंजेकशन आणि इलेक्शनमधला फरक आधी समजून घ्या!”

 

डॉक्टर असलेल्या नगराध्यक्षांना नागरिकांनी आता उपरोधिक शब्दांत लक्ष्य केले आहे. “आधी इंजेकशन आणि इलेक्शनमधला फरक समजून घ्या,” असा टोला लगावत नागरिकांनी निवडणुकीतील आश्वासने आणि प्रत्यक्ष कारभार यातील फरक दाखवून दिला आहे. निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामातून या विश्वासाला न्याय देणे आवश्यक असल्याची भावना शहरात व्यक्त होत आहे.

 

‘लाडकी बहीण हॉस्पिटल’; मग ‘लाडके भाऊ’ कुठे गेले?

 

महाराष्ट्रातील पहिले ‘लाडकी बहीण हॉस्पिटल’ अमळनेरमध्ये सुरू करण्याची घोषणा करण्यात आल्याचे सांगितले जात असताना, “मग लाडके भाऊ कुठे गेले?” असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे. आरोग्यसेवा ही सर्व नागरिकांसाठी असताना एका विशिष्ट वर्गाच्या नावाने योजना जाहीर करून भेदभावाची भावना निर्माण करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महिला आणि पुरुष अशा दोन्ही घटकांना समान आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे एखाद्या योजनेच्या नावापेक्षा प्रत्यक्षात नागरिकांना उपचार, डॉक्टर, औषधे, तपासण्या आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

“एक ना धड, भाराभर चिंध्या!”

 

नगराध्यक्षांचे जळगाव येथे स्वतःचे खाजगी हॉस्पिटल असल्याने तेथील जबाबदारी आणि अमळनेर नगरपालिकेच्या कारभाराला किती वेळ देता येईल, हा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहेत. जळगावला स्वतःचे खाजगी हॉस्पिटल, अमळनेरला नगराध्यक्षपदाची जबाबदारी; दोन्हीकडे पुरेसा वेळ देता येत नसेल तर शहराचा कारभार कसा पाहणार? असा सवाल केला जात आहे. “तिथेही वेळ देता येत नाही आणि इथेही वेळ देता येत नाही, अशी परिस्थिती झाली तर ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी अवस्था होईल,” अशी टीका नागरिकांमधून होत आहे. नगराध्यक्षपद ही केवळ घोषणा करण्याची नव्हे, तर दररोज नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय करण्याची जबाबदारी असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

 

पालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे का?

 

नवीन हॉस्पिटल उभारण्याच्या घोषणेने पालिकेवर येणाऱ्या आर्थिक भाराबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. नगरपालिका आधीच आर्थिक अडचणींना सामोरी जात असताना नवीन हॉस्पिटलचा खर्च पालिका कशी उचलणार? डॉक्टर कुठून आणि कशा पद्धतीने नियुक्त केले जाणार? त्यांच्या वेतनाचा भार कोण उचलणार? औषधे, उपकरणे, तांत्रिक कर्मचारी, देखभाल, वीज, पाणी आणि इतर खर्चासाठी निधी कुठून उपलब्ध होणार? असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर आहेत.

पालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता केवळ घोषणा करण्यात आल्या आणि भविष्यात त्याचा आर्थिक भार नागरिकांच्या माथी पडला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही उपस्थित होत आहे.

 

आधी २१ दिवस पाणी नाही, मग हॉस्पिटलमध्ये सुविधा कशा?

 

शहरातील सर्वात गंभीर प्रश्न सध्या पाणीपुरवठ्याचा आहे. नागरिकांना तब्बल २१ दिवस नियमित पाणीपुरवठा करता आला नाही. अनेक भागांत नळाला पाणी कधी येईल, याची शाश्वती राहिलेली नाही. पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असताना त्याच प्रश्नाकडे दुर्लक्ष करून नवीन हॉस्पिटलच्या घोषणा करण्याला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.

“जे प्रशासन २१ दिवस शहराला पाणी देऊ शकत नाही, ते नवीन हॉस्पिटलमध्ये नागरिकांना कोणत्या सुखसुविधा देणार?” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि डास प्रतिबंध या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याऐवजी नव्या योजनांचे गाजर दाखविले जात असल्याची टीका होत आहे.

 

कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि डासांचे साम्राज्य

 

शहरातील अनेक भागांत कचरा वेळेवर उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीयुक्त वातावरण आणि वाढलेला डासांचा प्रादुर्भाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणीपुरवठा विस्कळीत आणि स्वच्छता व्यवस्था ढासळलेली असताना आरोग्यसेवेची नवी घोषणा करण्यापूर्वी विद्यमान व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडविणे ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे “घोषणांचे इंजेकशन नको, कामाचे इंजेकशन द्या!” अशा शब्दांत नागरिक प्रशासनावर निशाणा साधत आहेत.

 

घोषणांपेक्षा आता प्रत्यक्ष कामाची अपेक्षा

 

निवडणुकीपूर्वी नागरिकांना दाखविण्यात आलेली स्वप्ने आणि सत्तेत आल्यानंतरची प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याची भावना अमळनेरकरांमध्ये वाढत आहे. नगराध्यक्षपदाची जबाबदारी नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने दिली आहे. त्यामुळे अल्पावधीतच नागरिकांचा भ्रमनिरास होऊ नये, यासाठी मूलभूत नागरी सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. नवीन हॉस्पिटलची घोषणा करण्यापूर्वी पालिकेचा विद्यमान दवाखाना सक्षम करावा, तेथे आवश्यक डॉक्टर, औषधे, तपासणी सुविधा आणि आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावीत. त्याचबरोबर शहराचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करावा, नियमित कचरा संकलन करावे, शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी आणि डास प्रतिबंधक फवारणीसह आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *