
न्यू व्हिजन स्कूल, अमळनेर येथे सात दिवसीय योगशिबीर उत्साहात संपन्न
अमळनेर (प्रतिनिधी )के. सी. ई. सोसायटी संचलित मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागामार्फत अमळनेर येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सात दिवसीय योग शिबिराचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते.
या योग शिबिराचे उद्घाटन योगशिक्षिका सौ. पूनम शशिकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक योग प्राध्यापक डॉ. देवानंद सोनार सर तसेच प्राध्यापिका सौ. ज्योती वाघ मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
दि. २७ एप्रिल २०२६ ते दि. ३ मे २०२६ दरम्यान दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत हे योग शिबिर पार पडले. अमळनेर शहरातील विविध भागांतील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होत शिबिराचा लाभ घेतला.
योगशिक्षिका सौ. पूनम पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना विविध योगासने, प्राणायाम तसेच शुद्धी क्रियांचे प्रात्यक्षिक करून दाखवत त्यांचे सखोल प्रशिक्षण दिले. उपस्थित महिलांकडून प्रत्यक्ष योग व प्राणायाम करून घेण्यात आले. विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य आयोजित करण्यात आले होते.
शिबिराच्या समारोपप्रसंगी सौ. पूनम पाटील यांनी योग व प्राणायामाचे मानवी जीवनातील महत्त्व, आरोग्यदायी जीवनशैलीसाठी त्यांची आवश्यकता याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. योगशिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी महिलांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

Leave a Reply