
अमळनेरात वर्षप्रतिपदेनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष पथसंचलन उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी) वर्षप्रतिपदेनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने शहरात सघोष पथसंचलन मोठ्या उत्साहात पार पडले. शिस्तबद्ध रचना, घोष पथकाचा निनाद आणि स्वयंसेवकांचा उत्साह यामुळे शहरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते.
या निमित्ताने प्रताप मिल कंपाऊंड येथे स्वयंसेवक मोठ्या संख्येने एकत्र जमले. प्रारंभी सर्वांचे गणशः संपत करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण व संघ प्रार्थना पार पडल्यानंतर पथसंचलनास सुरुवात झाली.
संचलनात सर्वात पुढे भगवा ध्वज, त्यानंतर गण एक व दोन, घोष पथक आणि त्यापाठोपाठ गण तीन ते सहा अशा शिस्तबद्ध पद्धतीने स्वयंसेवक सहभागी झाले होते. प्रताप मिल कंपाऊंड येथून कॉलेज रोड, धुळे रोड, भगवा चौक, मराठा मंगल कार्यालय, महाराणा प्रताप चौक, कचेरी रोड, बजरंग सुपर शॉप मार्गे पुन्हा प्रताप मिल कंपाऊंड येथे संचलनाची सांगता करण्यात आली. संचलन मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या काढून तसेच फुलांचा वर्षाव करून स्वयंसेवकांचे स्वागत केले. सर्व स्वयंसेवक गणवेशात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. संचलनानंतर वर्षप्रतिपदेचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आद्य सरसंघचालकांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र शिंदे यांनी केले. जिल्हा संघचालक डॉ. मनोज साळुंखे यांनी संघरचनेतील विविध जबाबदाऱ्यांची घोषणा केली.
यानंतर सांघिक पद्य, अमृतवचन व सुभाषितांचे सादरीकरण करण्यात आले. वैयक्तिक पद्य दिनेश पाटील यांनी सादर केले. प्रमुख वक्ते व अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व्यंकयाजी भागयाजी यांनी बौद्धिक मार्गदर्शन केले. संघ प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply