
अमळनेरात ५१ फूट उंच ‘महामंगल गुढी’चा दिमाख; गुढीपाडवा उत्सवात भक्तीभावाचा केला जल्लोष
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर येथे गुढीपाडवा निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गुरुवार, दि. १९ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता ५१ फूट उंचीची ‘महामंगल गुढी’ उभारण्यात आली. या भव्य गुढीचे पूजन अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले.
सोहळ्याच्या प्रारंभी शंखनाद व प्रभू श्रीरामचंद्रांच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. सर्वप्रथम आराध्य दैवत श्री गणपती बाप्पांचे आवाहन करून मंत्रोच्चारात अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर ५१ फूट उंच गुढीची पूजा-अर्चा करून ती आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली व नैवेद्य अर्पण करण्यात आला. उपस्थित भाविकांनी प्रभू श्रीरामचंद्र तसेच मंगळग्रह भगवंतांचा जयघोष करत उत्सवात भक्तिभाव व्यक्त केला.
यानंतर गुढी उभारणीचा मुख्य सोहळा पार पडला. मंदिराचे पुरोहित जयेंद्र वैद्य यांनी मुख्य पौरोहित्य केले, तर गणेश जोशी, अतुल दीक्षित, हेमंत गोसावी व उमेश पाठक यांनी सहकार्य केले.
या प्रसंगी अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी, कृषक पर्यावरणतज्ज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा, सचिव डॉ. बेरीदम गुणाकर, भूमी सुपोषण अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक नवल रघुवंशी तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भव्य गुढी उभारणी, मंत्रोच्चार आणि जयघोषामुळे संपूर्ण मंदिर परिसरात धार्मिक व उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply