शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ दोन महिन्यात ५८२ लोकांचे तोडले लचके

चौका- चौकात सुळसुळाट; शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार भयभीत

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिक मेटाकुटीस आले आहेत. रात्रभर भुंकणे आणि दिवसा पादचारी व वाहनधारकांच्या मागे झुंडीने धावून हल्ला चढवतात. शहरात दोन महिन्यात ५८२ लोकांना श्वानांनी चावा घेतला आहे. नगरपालिकेचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. ई-निविदेद्वारे  दरपत्रक मागविण्यात पालिकेचे ‘निर्बीजीकरण’ अडकले आहे.

शहरातील पिंपळे रोड, ढेकू रोड,धुळे रोड, आठवडे बाजार, भालेराव नगर, आर. के. नगर, गलवाडे रोड, आदी परिसरातील रहिवासी मोकाट कुत्र्यांमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरात मुकाट कुत्री हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांवर झुंडीने हल्लेही करत आहेत. शहरातील ग्रामीण रुग्णालयात जानेवारी- ४७५ व फेब्रुवारी- १०७  रुग्णांना कुत्रा चावल्याने प्राथमिक स्तरावर रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. या आकडेवारीवरूनच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. मात्र पालिका प्रशासन पालिका हद्दीतील श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करणे याबाबत नवीन जाहीर  ई- निविदाद्वारे दरपत्रक मागविण्याचा विचार विनिमय करून केवळ कागदी घोडे नाचत आहे. निर्बीजीकरण अभावी शहरात पाळीव व मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असताना मात्र पालिकेतर्फे उपायोजनांवर गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना मोकाट कुत्र्यांच्या झुंडींचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी शहरातील अनेक भागातून कुत्र्यांच्या हल्ल्याच्या तक्रारी वाढत आहे. पालिका प्रशासनाला पिंपळे रोड परिसरातील नागरिकांनी २८जून २०२५ रोजी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिलेले आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात पालिकेला परत स्मरणपत्र दिलेले असताना देखील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्यामुळे येत्या आठ दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त पालिका प्रशासनाने न केल्यास या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पिंपळे परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

 

पत्र देऊनही पालिकेकडून दुर्लक्ष

 

या भागात पालिका प्रशासनाचे लक्ष नाही. गेल्या आठ महिन्यापासून मोकाट कुत्र्यांच्या त्रासाबद्दल पालिका प्रशासनाला निवेदन दिलेले असताना देखील पालिका प्रशासनाने आज पावेतो कुठलीही कारवाई केलेली नाही. रात्री- बेरात्री महिला, जेष्ठ नागरिक व पादचाऱ्यांवर आणि शालेय विद्यार्थ्यांवर ही मोकाट कुत्री धावून जातात. तरी लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा या विरोधात आंदोलन करण्यात येईल.

गणेश बोरसे, रहिवासी, पिंपळेरोड परिसर

 

लवकरच निर्बीजीकरणची प्रक्रिया राबवू

 

मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक १६ – नगरपरिषद हद्दीतील श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी नवीन जाहीर ई- निविदाद्वारे दरपत्रक मागविण्यावर सविस्तर चर्चा झाली असून लवकरच ई-निविदा मागविण्यात येईल. तसेच पिंपळे रोड परिसरातील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्वरित मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.

गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *