बस आगाराच्या १ कोटी ९६ लाखांच्या काँक्रिटीकरणाला राजकीय ‘ब्रेक’; पाच महिन्यांपासून आर्थिक निविदा रखडली

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बस आगारातील वाहनतळाच्या काँक्रिटीकरणासाठी १ कोटी ९६ लाख ७७ हजार ७६० रुपयांची इलेक्ट्रॉनिक निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. चार ठेकेदारांनी निविदा भरल्यानंतर दोन ठेकेदार तांत्रिक कारणाने अपात्र ठरले, तर उर्वरित दोन ठेकेदार आर्थिक लिफाफ्यासाठी पात्र ठरले. मात्र, १७ एप्रिल रोजी उघडणे अपेक्षित असलेली आर्थिक निविदा पाच महिने उलटूनही उघडण्यात आलेली नसल्याने काम रखडले आहे. दरम्यान, आगारातील खड्डे, उखळलेली खडी, धूळ व चिखलामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने बस आगारातील वाहनतळाच्या जागेचे काँक्रिटीकरण करण्यासाठी १ कोटी ९६ लाख ७७ हजार ७६० रुपये किमतीची इलेक्ट्रॉनिक निविदा १० मार्च रोजी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रसिद्ध केली होती. निविदा भरण्याची अंतिम मुदत १७ मार्च होती. या कामासाठी चार ठेकेदारांनी निविदा भरल्या. १६ एप्रिल रोजी तांत्रिक लिफाफा उघडण्यात आला. त्यात दोन ठेकेदारांना तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप ठेकेदार वर्गातून होत असून, उर्वरित दोन ठेकेदारांच्या निविदा आर्थिक लिफाफ्यासाठी पात्र ठरविण्यात आल्या.

विशेष म्हणजे आर्थिक लिफाफा उघडण्याची तारीख १७ एप्रिल निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तब्बल पाच महिने उलटूनही आर्थिक लिफाफा उघडण्यात आलेला नाही. संबंधित कामाचा कार्यारंभ आदेशही अद्याप देण्यात आलेला नाही. राजकीय लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळेच ही प्रक्रिया रखडल्याचा आरोप ठेकेदार वर्गातून केला जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचूनही पुढील निर्णय होत नसल्याने महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, काँक्रिटीकरणाचे काम रखडल्याने आगाराची सध्याची अवस्था प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. वाहनतळाच्या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यावरील उखळलेली खडी आणि धुळीमुळे प्रवाशांसह आगारातील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी व चिखल साचल्याने प्रवाशांना बसपर्यंत जाण्यासाठी चिखलातून वाट काढावी लागत आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच सामान घेऊन प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. एकीकडे तब्बल दोन कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया पाच महिन्यांपासून प्रलंबित आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना दररोज या असुविधेचा सामना करावा लागत आहे.

शासकीय कामांच्या इलेक्ट्रॉनिक निविदा प्रक्रिया खुल्या, पारदर्शक आणि स्पर्धात्मक पद्धतीने राबविणे अपेक्षित आहे. चार ठेकेदारांनी निविदा भरल्यानंतर दोन ठेकेदारांना तांत्रिक कारणाने अपात्र करण्यात आले आणि उर्वरित दोन ठेकेदार आर्थिक लिफाफ्यासाठी पात्र ठरले असताना त्यांची आर्थिक निविदा पाच महिन्यांपासून का उघडण्यात आलेली नाही, याचे स्पष्टीकरण महामंडळ प्रशासनाने देणे गरजेचे आहे. निविदा प्रक्रियेत कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्यास पुढील प्रक्रिया इतका प्रदीर्घ काळ का थांबली, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

निविदा प्रक्रियेवर संशयाचे सावट निर्माण झाल्याने सदर निविदा रद्द करून नव्याने खुली, पारदर्शक आणि स्पर्धात्मक इलेक्ट्रॉनिक निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी ठेकेदार वर्गातून होत आहे. तसेच आगारातील खड्डे, उखळलेली खडी आणि धुळीच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

१ कोटी ९६ लाख रुपयांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची आर्थिक निविदा कधी उघडणार, कार्यारंभ आदेश कधी निघणार आणि अमळनेरच्या प्रवाशांना खड्डे, धूळ व चिखलातून कधी मुक्ती मिळणार, याकडे आता अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.

 

तर काम लवकर सुरू करावे..

 

“बस आगारात येताना आणि बसपर्यंत जाताना खड्डे, उखळलेली खडी आणि चिखलाचा मोठा त्रास होतो. पावसात परिस्थिती आणखी बिकट होते. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. जवळपास दोन कोटी रुपयांचे काँक्रिटीकरण होणार असेल तर त्याचे काम लवकर सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी.”

 हितेशभाई शहा, प्रवासी, अमळनेर

 

उद्याच काम सुरू करण्याबाबत ठेकेदाराला नोटीस देऊ

“अमळनेर बस आगाराच्या काँक्रिटीकरणाच्या निविदेबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्याच काम सुरू करण्याबाबत ठेकेदाराला नोटीस देण्यात येईल. कामाच्या प्रक्रियेत कोणताही अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.”

 भिलारकर विद्या जितेंद्र, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, प्रादेशिक कार्यालय, नाशिक

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *