
सबगव्हाण विकासोच्या सभेवरून संभ्रम; सचिवांना ‘अटॅक’ आल्याने जिल्हा बँक संचालक निवडीचा ठराव रखडला
चेअरमनचा दावा : सहा विरुद्ध पाच मतांनी ठराव झाला; सचिवांअभावी इतिवृत्त लिहिणे बाकी — सदस्याचा पलटवार : “सभाच झाली नाही”
अमळनेर (प्रतिनिधी )तालुक्यातील सबगव्हाण येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभेवरून सध्या संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडीसाठी मतदानाचा अधिकार देण्याच्या ठरावासाठी आयोजित सभेदरम्यान सोसायटीचे सचिव विजय पाटील यांना अचानक प्रकृतीचा त्रास झाल्याने ते सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे ठरावाच्या प्रक्रियेवर तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडीसाठी मतदानाचा अधिकार देण्याकरिता सबगव्हाण विकासोची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी सभासद उपस्थित झाले होते. मात्र, सचिव विजय पाटील यांना अचानक अटॅक आल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सभेची पुढील प्रक्रिया कशी करावी, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, “सहा विरुद्ध पाच मतांनी ठराव करून घेतला असून केवळ सचिव नसल्याने बैठकीचे इतिवृत्त (प्रोसेडिंग) लिहिणे बाकी आहे,” असा दावा विकासोचे चेअरमन सुरेश पाटील यांनी केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, सचिवांच्या अनुपस्थितीत ठरावाची नोंद करण्यासाठी नवीन सचिव नियुक्त करून इतिवृत्त लिहिण्याबाबत जिल्हा बँकेच्या महाव्यवस्थापकांना पत्र देण्यात येणार आहे. ठराव करण्यासाठी २ सप्टेंबर ही अंतिम मुदत असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, सोसायटीचे सदस्य सचिन पाटील यांनी चेअरमनच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. “सभाच झाली नाही आणि कोणाच्या नावाचा ठराव करायचा, त्या नावाची चर्चाच झाली नाही. सचिवांशिवाय सभा सुरूच होऊ शकत नाही,” असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, सभा कोरमअभावी तहकूब करण्याची तरतूद असली तरी सभेचा सचिव अनुपस्थित असल्यास सभा तहकूब करायची की रद्द करायची, याबाबत नेमकी प्रक्रिया काय, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या या प्रकरणात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी याबाबत बैठक होऊ शकली नाही. त्यानंतर रविवारची सुट्टी असल्याने आता सोमवारी जिल्हा बँकेचे महाव्यवस्थापक कार्यालयात उपस्थित राहिल्यानंतर या ठरावाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सबगव्हाणसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.
चेअरमन सुरेश पाटील म्हणतात…
“सहा विरुद्ध पाच मतांनी ठराव करून घेतला आहे. सचिव नसल्यामुळे केवळ प्रोसेडिंग लिहिणे बाकी आहे. नवीन सचिव देऊन ठरावाची नोंद करण्यात यावी, यासाठी जिल्हा बँकेच्या महाव्यवस्थापकांना पत्र देण्यात येणार आहे.”
सदस्य सचिन पाटील यांचा आक्षेप
“सभाच झाली नाही. कोणाच्या नावाचा ठराव करायचा, याची चर्चादेखील झाली नाही. सचिवांशिवाय सभा सुरूच होऊ शकत नाही.”

Leave a Reply