मालपूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची अचानक धडक

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मालपूर येथे कृषी विभागामार्फत शेतीशाळेचे नियोजन करण्यात आले असताना, शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मालपूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ येथे आकस्मिक भेट देऊन दवाखान्यातील कामकाजाची पाहणी केली.

या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पशुधनासाठी सुरू असलेल्या आरोग्यसेवा, उपचार व्यवस्था, औषधसाठा, उपलब्ध सुविधा तसेच शेतकरी व पशुपालकांना देण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय सेवांची माहिती जाणून घेतली. सध्या सुरू असलेल्या एफएमडी लसीकरणाच्या नवव्या फेरीच्या नियोजनाचाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

पशुपालकांच्या दैनंदिन जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व असून, पशुधनाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दवाखान्यातील सेवा-सुविधा तसेच प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शेतकरी व पशुपालकांना अधिक प्रभावी, तत्पर आणि दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा देण्याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील पशुपालकांना आवश्यक उपचार, लसीकरण आणि आरोग्यविषयक सेवा वेळेत मिळाव्यात, यासाठी कार्यक्षमतेने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, जिल्हा कृषी अधीक्षक तडवी, तालुका कृषी अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक डॉ. विक्रांत पाटील, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, सरपंच तसेच मालपूर येथील नागरिक उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *