विषारी द्रव्य प्राशन केलेल्या विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील जानवे येथे एका २८ वर्षीय विवाहित महिलेने विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता घडली. उपचार सुरू असताना २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मनिषा समाधान पाटील (वय २८, रा. जानवे) यांनी २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नर्मदा फाउंडेशन येथे दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी मनिषा समाधान पाटील यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची खबर महिलेचे भाऊ परशुराम अनिल बाविस्कर (रा. पष्टाणे) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रकरणाचा पुढील तपास एपीआय गणेश अहिरे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *