
ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करताना आमदार अनिल पाटील संतप्त
उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश; अस्वच्छता व बंद स्वच्छतागृहावर नाराजी

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयाला माजी मंत्री तथा आमदार यांनी आज अचानक भेट देत विविध विभागांची पाहणी केली. उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याने बंद असलेले स्वच्छतागृह, तुटलेले दरवाजे तसेच नवीन बांधकामाच्या संथ गतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
उपजिल्हा रुग्णालयासाठी वरच्या मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामाची गती अत्यंत मंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यांत बांधकाम पूर्ण करण्याचे कडक आदेश त्यांनी दिले. तसेच वर्षभरापासून बंद असलेले स्वच्छतागृह तातडीने सुरू करून त्याची दुरुस्ती करावी व तुटलेले दरवाजे बदलण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रुग्णालयातील बेडशीट अस्वच्छ असल्याचे आढळून आल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त करत रुग्णांच्या आरोग्याशी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला. त्यांनी औषधालयासह प्रत्येक विभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वच्छ व दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच रुग्णालय प्रशासनाला तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे यांच्याकडून आमदारांनी रुग्णालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, विजय पाटील, जयेश पाटील उपस्थित होते. रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. सुमित पाटील, डॉ. परेश पाटील, बांधकाम अभियंता भागवत माळी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
उष्माघात कक्षाचीही केली पाहणी
अमळनेर तालुक्यात उष्णतेमुळे काही बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी उष्माघात कक्षाचीही पाहणी केली. या कक्षात कुलर, थंड पाणी, पुरेसा औषधसाठा आणि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

Leave a Reply