
अमळनेरसाठी ‘जुलै’ ठरला आपत्तींचा भडीमार; आगीपासून महापुरापर्यंत संकटांची अखंड मालिका
आगीचे चटके, मृत्यूचे धक्के आणि महापुराचा कहर; जुलैने अमळनेरला दिल्या असंख्य जखमा

एका महिन्यात अमळनेरकरांनी सोसल्या वेदना, पण माणुसकीने दिला जगण्याचा आधार
अमळनेर ( प्रतिनिधी) काही महिने कॅलेंडरवर येतात आणि निघून जातात; मात्र काही महिने इतिहासात कायमचे कोरले जातात. जुलै २०२६ हा अमळनेरकरांसाठी असाच वेदनादायी महिना ठरला. महिन्याच्या पहिल्याच दिवशी संत सखाराम महाराज वाडी संस्थानातील भीषण आगीने संकटाची सुरुवात झाली आणि महिन्याच्या अखेरीस महापुराने संपूर्ण शहर-तालुक्याला अक्षरशः वेढा घातला. या काळात अपघात, मृत्यू, आत्महत्या, गुन्हेगारी आणि नैसर्गिक आपत्तींच्या मालिकेने अमळनेरकरांच्या मनावर खोल जखमा केल्या.
१ जुलै : संत सखाराम महाराज वाडी संस्थानातील भीषण आग
जुलैच्या पहिल्याच दिवशी संत सखाराम महाराजांची पालखी सोहळा पार पडत असतानाच वाडी संस्थानात भीषण आग लागली. शेकडो वर्षांचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या लाकडी वास्तूचे मोठे नुकसान झाले. देवमूर्ती सुरक्षित राहिल्याने भाविकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या संकटात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन मदतकार्य करत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले.
तीन बालमित्रांच्या मृत्यूने तालुका हादरला
३ जुलै रोजी चोपडा रस्त्यावरील खदाणीत साचलेल्या पाण्यात बुडून तीन अल्पवयीन बालमित्रांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण अमळनेर शोकसागरात बुडाला.
कर्तव्य बजावताना वायरमनचा मृत्यू
महावितरणचे वायरमन शरद बन्सीगीर गोसावी पावसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करत असताना विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले. नागरिकांच्या घरात उजेड राहावा म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर कायमचा अंधार पसरला.
रेल्वे पुलावर कामगाराचा दुर्दैवी अंत
बोरी नदीवरील रेल्वे पुलावर दुरुस्तीचे काम करताना उदय शिवाजी बोरसे यांचा तोल जाऊन नदीत पडल्याने मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण भागातील दुःखद घटना
खेडी गावातील तरुण शेतकरी श्याम सुनील पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्याच काळात कळमसरे येथील दीपक राजपूत यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ग्रामीण भागातही दुःखाचे सावट कायम राहिले.
गुन्हेगारीवर पोलिसांचा मोठा बडगा
जुलै महिन्यात गंभीर गुन्हे, मारामाऱ्या, लैंगिक अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली. काही प्रकरणांत न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावल्या. अवैध वाळू वाहतूक, अवैध शस्त्रे, दारू याविरोधात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाया करत जेसीबी, डंपर आणि ट्रॅक्टर जप्त केले. शहरात विशेष कोंबिंग ऑपरेशनही राबविण्यात आले.
३१ जुलै : महापुराने अमळनेरला वेढले
महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाने बोरी नदी, पिंपळे नाला आणि इतर नाल्यांना महापूर आला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, रस्ते बंद झाले, वीजपुरवठा खंडित झाला आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान महापुराचे पाणी कृषी उत्पन्न बाजार समितीत शिरल्याने व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला.
गावांचा संपर्क तुटला; वीज यंत्रणा कोलमडली
अतिवृष्टीमुळे सात्रीसह अनेक गावांचा संपर्क तुटला. अमळनेर-जळगाव, अमळनेर-धुळे आणि अमळनेर-चोपडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अनेक रोहित्रे पाण्यात गेल्याने वीजपुरवठाही खंडित झाला.
संकटात माणुसकीचा हात पुढे
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जयनिल फाऊंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जैन सोशल ग्रुप, पत्रकार संघ तसेच अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या. अन्न, पिण्याचे पाणी, जेसीबी, डंपर, वैद्यकीय मदत आणि बचावकार्य राबविण्यात आले. अग्निशमन दल, पोलीस, महसूल विभाग, नगरपरिषद, आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवकांनी जीवाची पर्वा न करता मदतकार्य केले.
जून महिन्यातील भीषण अपघाताची जखमही ताजीच
जुलैपूर्वीच जून महिन्यात अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळजवळ झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एकाच कुटुंबातील चौघांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या घटनेची वेदना ताजी असतानाच जुलैमधील संकटांनी अमळनेरकरांच्या दुःखात भर टाकली.
‘जुलै’ कायम लक्षात राहील…
आग, अपघात, आत्महत्या, गुन्हेगारी, महापूर आणि मानवी जीवितहानी अशा असंख्य संकटांनी जुलै २०२६ अमळनेरच्या इतिहासातील सर्वाधिक वेदनादायी महिन्यांपैकी एक ठरला. मात्र या काळात अमळनेरकरांनी दाखवलेली एकजूट, सामाजिक ऐक्य आणि संकटात धावून जाण्याची माणुसकी हीच या काळोखात आशेची सर्वात मोठी किरण ठरली.

Leave a Reply