
पॅरोलवर सुटलेल्या जन्मठेपेच्या कैद्याला अमळनेर पोलिसांनी शिताफीने पकडले; पुन्हा कारागृहात रवाना
अमळनेर (प्रतिनिधी) खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर एका व्यापाऱ्याची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक घटना अमळनेर येथे उघडकीस आली. या प्रकरणात अमळनेर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला घरात घेराबंदी करून शिताफीने पकडले व त्याला पुन्हा सुरत येथील लाजपोर सेंट्रल कारागृहात रवाना केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कैलास नवघरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर अमळनेर येथे खून, दहशत, खंडणी, जबरी चोरी व रस्ता लूट यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुजरातमधील एका व्यापाऱ्याच्या खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. न्यायालयाने २७ फेब्रुवारी रोजी त्याला पॅरोलवर सोडले होते. मात्र ४ मार्च रोजी पॅरोलची मुदत संपल्यानंतरही तो कारागृहात परतला नव्हता. दरम्यान, नवघरे याने एका स्थानिक व्यापाऱ्याला जागा स्वतःची असल्याचा दावा करत ती ताब्यात देण्याची किंवा दोन कोटी रुपये देण्याची धमकी दिली. या प्रकाराची माहिती व्यापाऱ्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना दिली. पोलिसांनी लेखी तक्रार देण्यास सांगितले असता दहशतीपोटी व्यापाऱ्याने असमर्थता दर्शवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक निकम यांनी उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद काकळीज तसेच इतर कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून कारवाई केली. पथकाने नवघरेच्या घराला घेराव घातला असता घराचे दोन्ही दरवाजे बंद आढळले. पोलिसांनी पहारा ठेवत आवाज दिला असता आरोपीने लहान खिडकीतून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र अपयशी ठरल्यावर तो पुन्हा घरात लपला. पोलिसांनी दरवाजा उघडून घराची तपासणी केली असता नवघरे शौचालयाच्या वरच्या कोपऱ्यातील अरुंद जागेत लपून बसल्याचे आढळले. सखोल शोध घेत त्याला अखेर पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ सुरत येथील लाजपोर सेंट्रल कारागृहात जमा केले. विशेष म्हणजे, यापूर्वीही पॅरोलवर सुटल्यानंतर नवघरे याने वाहन लुटण्याचा प्रयत्न केल्याची नोंद आहे. त्यामुळे या कारवाईमुळे पोलिसांच्या सतर्कतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

Leave a Reply