
बोरी नदी पुलावर रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम करताना नदीत पडून कामगाराचा मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) बोरी नदीवरील रेल्वे पुलावर रुळांच्या दुरुस्तीचे काम करत असताना पुलावरून नदीत पडल्याने एका रेल्वे कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २८ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. उदय शिवाजी बोरसे (रा. नंदुरबार) असे मृत कामगाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उदय शिवाजी बोरसे हे रेल्वे विभागातील कामगार असून, अमळनेर परिसरातील बोरी नदीवरील रेल्वे पुलावर रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. दि. २८ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते पुलावर दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक तोल जाऊन पुलावरून खाली नदीत पडले. या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. घटनेनंतर सहकाऱ्यांनी व उपस्थितांनी तातडीने उदय शिवाजी बोरसे यांना नदीतून बाहेर काढून उपचारासाठी नर्मदा फाउंडेशन येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे रेल्वे कामगारांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती स्टेशन प्रबंधक विकास पाटील यांनी अमळनेर पोलिसांना दिली. त्यानंतर सुनील गव्हाणे यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत. कामगार पुलावर दुरुस्तीचे काम करत असताना नेमकी कोणत्या परिस्थितीत नदीत पडले, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Leave a Reply