
बँक ऑफ बडोद्यात मजुराची पिशवी कापून ३१ हजार २०० रुपयांची चोरी
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील न्यू प्लॉट, जैन मंदिरासमोरील बँक ऑफ बडोदा शाखेत भरदिवसा पिशवी कापून ३१ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी घडली. फिक्स डिपॉझिट भरण्यासाठी आलेल्या काशिनाथ उत्तम महाजन यांच्या पिशवीतील रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
याबाबत अधिक माहिती अशी की, काशिनाथ उत्तम महाजन (वय ६३, धंदा मजुरी, रा. बोरसे गल्ली, शाळा नं. १२ जवळ, अमळनेर) यांच्या फिर्यादीनुसार, ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० ते २ वाजेच्या सुमारास ते पत्नी रत्नाबाई महाजन यांच्यासह ३१ हजार २०० रुपये फिक्स डिपॉझिट करण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या शाखेत गेले होते. बँकेत स्लीप भरत असताना त्यांच्या हातातील नायलॉनची रंगीबेरंगी पट्टे असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने कापली. त्यानंतर पिशवीतील ३१ हजार २०० रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटा पसार झाला. घटना लक्षात आल्यानंतर घटनास्थळासह आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यात आला; मात्र चोरीस गेलेली रक्कम मिळून आली नाही. याप्रकरणी काशिनाथ उत्तम महाजन यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत गु.र.नं. ४६३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशान्वये पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदांनशिव करीत आहेत.

Leave a Reply