
वाडी संस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तातडीने शासनाकडे मागवा; आमदार अनिल भाईदास पाटील यांची विधानसभेत मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेचा मुद्दा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. तसेच वाडी संस्थानचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करून तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे त्वरित मागविण्याची मागणी त्यांनी केली.
सभागृहात बोलताना आमदार अनिल भाईदास पाटील म्हणाले की, अमळनेर शहरातील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान हे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असून या संस्थानला सुमारे २५० वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. संस्थानचे गादीपती संत सखाराम महाराज वर्षभर महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा झेंडा घेऊन धर्मप्रसाराचे कार्य करतात.
ते पुढे म्हणाले की, १ जुलै रोजी रात्री वाडी संस्थानच्या मंदिरात भीषण आग लागून सुमारे २५० वर्षे जुने गाभाऱ्याचे वैभव जळून खाक झाले. सुदैवाने मंदिरातील देवस्थान आणि मूर्ती सुरक्षित राहिल्या असल्या, तरी या आगीत अंदाजे १५ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर मंदिर काही दिवस भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. आगामी २५ जुलै रोजी आषाढी महोत्सवानिमित्त हजारो भाविक अमळनेरच्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे मंदिराचे पुनरुज्जीवन आणि पुनर्बांधणी तातडीने होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सभागृहात नमूद केले. मंदिराचे झालेले मोठे नुकसान आणि भाविकांची असलेली अपार श्रद्धा लक्षात घेता, वाडी संस्थानचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करून पर्यटन विकास विभागामार्फत या मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यात यावा. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे त्वरित मागविण्यात यावा, अशी मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी विधानसभेत केली.

Leave a Reply