माजी आमदार शिरीष चौधरींच्या निर्देशनुसार पत्रकार संजय पाटील, नगरसेवक पंकज चौधरी व नावेद शेख यांच्या मध्यस्थीने अखेर वाद मिटला !

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून अमळनेर नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कंत्राटी कामगार आणि ठेकेदार यांच्यात सुरू असलेला वाद अखेर तडजोडीअंतर्गत मिटविण्यात यश आले आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निर्देशनुसार पत्रकार संजय पाटील, नगरसेवक पंकज चौधरी आणि नावेद शेख यांच्या मध्यस्थीने हा वाद सोडविण्यात आला. या तोडग्यामुळे गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला भविष्यानिर्वाह निधीचा प्रश्न मार्गी लागला असून, भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत, अशी अपेक्षा कामगारांकडून व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, घनकचरा व्यवस्थापनातील सुमारे ६० कंत्राटी कामगारांना गेल्या चार वर्षांपासून ईपीएफची रक्कम न मिळाल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कामगारांनी मुख्याधिकारी, पीएफ सहआयुक्त, जिल्हाधिकारी तसेच माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या. नगरसेवक नावेद शेख यांनीही कामगारांची बाजू उचलून धरत, न्याय मिळेपर्यंत ठेकेदाराचे बिल व सुरक्षा ठेव रोखून धरण्याची मागणी केली होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी यापूर्वी दोन ते तीन बैठका घेण्यात आल्या होत्या; मात्र त्या निष्फळ ठरल्या. अखेर २० तारखेला पालिकेच्या सभागृहात निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीस नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, नगरसेवक अनिल महाजन, मुख्याधिकारी गणेश शिंदे, आरोग्य निरीक्षक संतोष जाधव, ठेकेदार रामदास पवार, सुपरवायझर खलील शेख, मेहुल बिऱ्हाडे तसेच कामगार उपस्थित होते. बैठकीत सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की, ठेकेदाराने मागील ईपीएफ थकबाकीच्या मोबदल्यात प्रत्येक कामगाराच्या बँक खात्यात २५ हजार रुपये जमा करावेत. तसेच यापुढील वेतन थेट बँक खात्यात जमा करण्याचेही ठरले. या निर्णयानंतर कामगारांच्या सर्व तक्रारी निकाली निघाल्या असून कामगारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कामगारांची बाजू प्रभावीपणे मांडणारे मेहुल बिऱ्हाडे यांच्यासह जगदीश संदानशिव, बबलू बिऱ्हाडे, राहुल युवराज बिऱ्हाडे, राजेश धाप, राज नायक, गोकुळ मोरे, शंकर मोरे, फिरोझ खाटीक, दिनकर बिऱ्हाडे, योगेश कोळी, जितेंद्र संदानशिव, पवन बिऱ्हाडे, कार्तिक संदानशिव आदींनी सातत्याने पाठपुरावा करून कामगारांना न्याय मिळवून दिला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *