स्मार्ट मीटर की ‘बिलांचा शॉक’?, दुप्पट-तिप्पट वीज बिलांवर ग्राहक पंचायत झाली आक्रमक

अमळनेर (प्रतिनिधी) स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना नेहमीच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट वीज बिले येत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असताना अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरने महावितरणच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारी ही वाढ नेमकी कशामुळे होत आहे, याचा खुलासा महावितरणने पारदर्शकपणे करावा, अशी मागणी करत ग्राहक पंचायतीने ४ ऑगस्ट रोजी महावितरण वीज कंपनी लिमिटेडच्या अमळनेर उपविभाग क्रमांक १ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांना निवेदन देऊन जाब विचारला.

स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांच्या मनात संभ्रम आणि भीती निर्माण होत असून, जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना नेहमीपेक्षा अधिक वीज बिले येत असल्याचा दावा ग्राहक पंचायतीने निवेदनात केला आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी सुविधा आहे की आर्थिक भुर्दंड, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांनी या विषयावर कार्यशाळा आयोजित करून ग्राहकांच्या स्मार्ट मीटरसंदर्भातील संभ्रमाचे पूर्णपणे निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरचे विजय शुक्ला, मकसूद बोहरी, सुनील वाघ, सतीश देशमुख, नरेंद्र बाळू पाटील, भाऊसाहेब देशमुख, दिलीप सारजे आणि सुभाष पाटील घोडगावकर उपस्थित होते.

 

‘स्मार्ट’ मीटर, पण ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार?

 

स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असताना ग्राहकांना त्याची कार्यपद्धती, वीज वापराची नोंद, बिल आकारणीची पद्धत, मीटरची अचूकता आणि तक्रार निवारणाची प्रक्रिया याबाबत पुरेशी व स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ग्राहकांच्या घरातील जुने मीटर काढून नवीन मीटर बसविले जाते; मात्र त्यानंतर अचानक वाढलेल्या बिलाचे कारण काय, याचे समाधानकारक उत्तर मिळणे आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ आणि वीज कायदा २०२३ नुसार ग्राहकांना योग्य माहिती, पारदर्शकता आणि आपल्या हक्कांबाबत स्पष्टता मिळणे आवश्यक आहे. मात्र स्मार्ट मीटरच्या प्रक्रियेत ही पारदर्शकता कुठे आहे, असा सवाल अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरने उपस्थित केला आहे.

 

मीटर चुकीचा असेल तर जबाबदार कोण? तपासणीची प्रक्रियाही पारदर्शक करा

 

स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत ग्राहकाला शंका असल्यास संबंधित मीटर कोणत्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला जातो, तपासणी कशी केली जाते आणि त्याचा अहवाल ग्राहकाला कशा पद्धतीने दिला जातो, याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मीटर अचूक असल्याचा महावितरणचा दावा असेल, तर त्याचे फायदे आणि अचूकता केवळ कागदोपत्री सांगण्याऐवजी तांत्रिक तपासणी व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ग्राहकांना पटवून द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

 

संमतीशिवाय मीटर बदलू नका!

 

ग्राहकांची संमती न घेता जुने मीटर बदलू नयेत आणि स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशी ठाम भूमिका ग्राहक पंचायतीने घेतली आहे. ग्राहकांच्या मनातील शंका दूर करून, संपूर्ण माहिती देऊन आणि पारदर्शक पद्धतीनेच स्मार्ट मीटरची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *