
माणुसकीचे फाटलेले लुगडे प्रेमाच्या धाग्यानेच शिवता येईल’ : हभप गोविंद महाराज
अमळनेर (प्रतिनिधी) “आजच्या जगात माणुसकी नावाचे लुगडे फाटले आहे, ते शिवण्यासाठी प्रेम नावाचा धागा पाहिजे. तुमचे घर कसे आहे याला महत्त्व नाही, तर घरातील माणसांमध्ये किती माणुसकी आहे हे महत्त्वाचे आहे,” असे हृदयस्पर्शी विचार महाराष्ट्रातील भारुड सम्राट हभप गोविंद महाराज यांनी अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात आयोजित भारुड कार्यक्रमात व्यक्त केले.
शेतकी संघाचे संचालक विक्रांत पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आळंदी येथील हभप गोविंद महाराज यांच्या भारुड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित होते. व्यसनमुक्तीवर परखड भाष्य करताना हभप गोविंद महाराज म्हणाले, “दारुड्या माणसाचा संसार सुखाचा नसतो. जहर पीनेवाला अकेला मरता है, लेकिन दारू पिनेवाला पूरा परिवार मारता है.” दारूच्या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. संपत चाललेली नातीगोती, कमी होत चाललेला कौटुंबिक जिव्हाळा आणि बदलती सामाजिक परिस्थिती यावर भाष्य करताना ते म्हणाले, “प्रेम, माणुसकी आणि जिव्हाळा आता फक्त फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर उरला आहे. आजची मुले आई-वडिलांपेक्षा अनोळखी व्यक्तींवर प्रेम करतात. आपल्या आई-बापावर प्रेम करा, आपल्या देशावर प्रेम करा. जन्मदात्या बापाची मान खाली जाऊ देऊ नका आणि आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका.”
संत साहित्याचे महत्त्व पटवून देताना त्यांनी संतांच्या विचारांचे श्रवण आणि वाचन करण्याचे आवाहन केले. “सुखाने जगायचे असेल तर संतांचे विचार ऐका, वाचा. ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ वाचल्यानंतर मुलगा अधिकारी होईलच असे नाही, पण तो चांगला माणूस नक्की होईल आणि आई-वडिलांना घराबाहेर काढणार नाही,” असेही त्यांनी सांगितले. हभप गोविंद महाराज यांनी आपल्या ओघवत्या भारुड शैलीतून समाजप्रबोधन, संस्कार, व्यसनमुक्ती, कुटुंबव्यवस्था आणि माणुसकीचा संदेश देत उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. त्यांच्या भारुडाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास आमदार अनिल दादा पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, नगरसेविका स्वप्ना पाटील, शेतकी संघाचे संचालक विक्रांत पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, मराठा समाजाचे संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केले.

Leave a Reply