अमळनेर शेतकी संघ निवडणुकीत उमेदवारांची गर्दी; १५ जागांसाठी तब्बल १६२ अर्ज दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) येथील शेतकी संघाच्या आगामी निवडणुकीत उमेदवारांची मोठी उत्सुकता पाहायला मिळत असून, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १५ जागांसाठी तब्बल १६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अनेक वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकी संघावर प्रशासक राज असल्यामुळे या निवडणुकीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. संघाच्या कारभारात थेट सहभाग मिळवण्यासाठी विविध मतदारसंघांतून अनेक दिग्गजांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार, २७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. ५ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून ६ मे ते २० मे या कालावधीत उमेदवारांना माघार घेण्याची संधी दिली जाणार आहे. २१ मे रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येऊन निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. ३० मे रोजी मतदान पार पडणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत एकूण १५ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये व्यक्ती मतदार संघासाठी ५ जागा, सोसायटी मतदार संघासाठी ५ जागा, महिला राखीव २ जागा, इतर मागासवर्ग (इमाव) १ जागा, अनुसूचित जाती/जमाती (एस.सी./एस.टी.) १ जागा आणि भटक्या जाती (एन.टी.) १ जागा राखीव आहेत. सर्वच मतदारसंघांतून तालुक्यातील प्रमुख आणि प्रभावी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वांचे लक्ष माघारीच्या प्रक्रियेकडे लागले असून, त्यानंतरच अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *