पूरग्रस्तांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात; ७८७ कुटुंबांना ७८ लाख ७० हजारांचा दिलासा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे २ हजार ७७३ मालमत्तांचे नुकसान झाले होते. या पूरग्रस्तांना शासनाकडून ३ कोटी ७ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, त्यापैकी ७८७ मालमत्ताधारकांच्या खात्यावर प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे ७८ लाख ७० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. नूतन तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांनी पदभार स्वीकारताच या प्रश्नाकडे लक्ष देऊन अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर शहरातील २ हजार २६ घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य, घरगुती साहित्य व इतर वस्तूंचे नुकसान झाले होते. तसेच १८ घरांची पडझड झाली असून १३३ दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. ग्रामीण भागात ३६३ घरांची पडझड, तर २३३ घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी मयुर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संयुक्त पाहणी केली होती. त्यानुसार घरात पाणी शिरून झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी १० हजार रुपये, घराची पडझड झाल्यास ४ हजार रुपये आणि दुकानात पाणी शिरल्यास ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मात्र, त्यानंतर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा निलंबित झाल्याने अनुदान वितरणाच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला. त्यांच्या जागी ज्योती वसावे यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. मात्र त्या दिव्यांग असल्याने क्षेत्रीय पाहणी तसेच इतर कामे करण्यास अडचणी येत होत्या. महसूल व वन विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्याकडे पदभार देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अपर आयुक्तांनीही याबाबत पत्र दिल्याने १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी डॉ. उमा ढेकळे यांच्याकडे अमळनेर तहसीलदारपदाचा पदभार सोपविला.

दरम्यान, वजा शिल्लक असलेल्या खात्यातूनही पूरग्रस्तांना अनुदान देता येईल, असे आदेश प्राप्त झाले होते. मात्र तहसीलदारांच्या खात्यावरून रक्कम वर्ग करण्यासाठी अमळनेरला सक्षम तहसीलदार उपलब्ध नसल्याने पूरग्रस्तांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास विलंब होत होता. याबाबत राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे भूषण भदाणे यांनीही अनुदान तातडीने वितरित करण्याची मागणी केली होती.

डॉ. उमा ढेकळे यांनी पदभार स्वीकारताच पूरग्रस्तांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही सुरू केली. त्यांनी स्वतःच्या लॉगिनवरून सुमारे १ हजार १०० लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया केली. त्यापैकी ७८७ लाभार्थ्यांच्या खात्यावर ७८ लाख ७० हजार रुपये जमा झाले असून, काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने ती परत आली आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी सुमारे ४०० लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग केली जाणार आहे.

 

बाबी तपासून नुकसानग्रस्तांच्या खात्यावर पैसे टाकले जातील

 

“लोकांचे कागदपत्रे, बँक खाते आदी बाबी तपासून नुकसानग्रस्त सर्वांच्या खात्यावर पैसे टाकले जातील आधी ज्यांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले त्यांच्या खात्यावर रकमा टाकणे सुरू आहे.

डॉ. उमा ढेकळे, तहसीलदार, अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *