असंख्य भाविकांच्या उपस्थितीत श्री मंगळग्रह मंदिरात भव्य महारुद्र पूजेची पूर्णाहुती

आमदार अनिलदादा पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात सुरू झालेल्या परम पवित्र तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजेची भक्ती, चैतन्य आणि मंगलमय वातावरणात पूर्णाहुतीने सांगता झाली. राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृद्धी तसेच मंगळग्रह सेवा संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त प्रथमच या भव्य महारुद्र अभिषेक पूजा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या पूर्णाहुतीच्या सोहळ्यास आमदार अनिल भाईदास पाटील व त्यांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद काकळीज यांच्यासह विविध पक्ष, संस्था, संघटना, समाजांचे पदाधिकारी, सदस्य, महिला मंडळांच्या पदाधिकारी व सदस्या तसेच असंख्य भाविक उपस्थित होते. प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती केशव पुराणिक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धार्मिक सोहळ्याचे यजमान मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या पत्नी आशा डिगंबर महाले होते. त्यांच्या शुभहस्ते तीन दिवसीय महारुद्र अभिषेक पूजेचे अनुष्ठान पार पडले. पूर्णाहुतीपूर्वी सकाळी साडेनऊच्या सुमारास सर्व स्थापित देवतांची पूजा करण्यात आली. ‘अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडलावर’ भगवान महादेव, श्री मंगळग्रह देव, भूमिमाता व पंचमुखी हनुमानजी यांचे आवाहन करून स्थापना करण्यात आली. त्यानंतर अरणीमंथन करून अग्नी प्रज्वलित करण्यात आला. नवग्रह रुद्र स्थापन करून हवन करण्यात आले. प्रधान देवता श्री मंगळग्रह देव व भगवान महादेव यांच्या प्रीत्यर्थ रुद्राच्या १२१ आवर्तनांनी हवन करण्यात आले. यामध्ये अंदाजे दोन हजार आहुत्या देण्यात आल्या. भगवान शंकरांच्या तांडवस्तोत्राने पूर्णाहुतीसाठी भक्तिमय वातावरण निर्माण झाले. त्यानंतर विशेष हवन, बलिदान व पूर्णाहुती पार पडली. पूर्णाहुतीनंतर महाआरती व मंत्रपुष्पांजली झाली.

यानंतर पुरोहितांनी फडकत्या चालीवर संगीताच्या साथीने शिवशंकरांचे भक्तिगीत सादर केले. यावेळी डॉ. डिगंबर महाले व आशा डिगंबर महाले, आमदार अनिल भाईदास पाटील व जयश्री अनिल पाटील यांच्यासह उपस्थित भाविकांनी नृत्याचा आनंद घेतला. भक्तीमय, चैतन्यमय आणि मंगलमय वातावरणात जल्लोषपूर्ण या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी श्री मंगळग्रह देवांचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. या तीन दिवसीय महारुद्र अभिषेक पूजेसाठी वेदमूर्ती व्यंकटेश कळवे गुरुजी, सारंग पाठक, शुभम वैष्णव, प्रसाद भंडारी, परशुराम शर्मा, पवन शर्मा, यश जोशी, चंद्रकांत जोशी, तुषार दीक्षित, जयंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, विनोद पाठक, दिव्येश जोशी, शैलेश जोशी, उमेश पंचभाई, निलेश रोडे, हेमंत गोसावी यांच्यासह अयोध्या व प्रयागराज येथून खास निमंत्रित गौरव मिश्रा, सूरज मिश्रा, मनजीत मिश्रा व हरिओम शुक्ल यांनी पौरोहित्य केले. त्यांना उमेश पाठक, प्रवीण भंडारी व चेतन नाईक यांच्यासह मंदिरातील सेवेकऱ्यांनी सहकार्य केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे तसेच मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, उमाकांत हिरे, बाळा पचार, पुषंद ढाके आदींनी सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.

 

आमदार अनिलदादा पाटील यांची टाळ वादनातून सेवा

 

महारुद्र अभिषेक पूजेच्या पूर्णाहुतीपूर्वी आमदार अनिल भाईदास पाटील काही वेळ ‘अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडल’ स्थानी बसले. यावेळी वाद्यवृंदाच्या साथीने सादर करण्यात आलेल्या श्री मंगळग्रह देव व भगवान शंकर यांच्या स्तुतीपर भजनांवर त्यांनी टाळ वादन करीत भक्तिभावाने साथसंगत केली. त्यांच्या या सहभागाने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधले. असंख्य भाविकांनीही स्तुतीपर भजनांचा व भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *