बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम; नगरपरिषद व लायन्स क्लबचा श्रमदान उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषद व लायन्स क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियान व स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे.

या उपक्रमात सहभागी झालेल्यांनी हातमोजे, मुखपट्ट्या व झाडू घेऊन बस स्थानक परिसर, प्रवासी थांबे तसेच बसेस उभ्या राहण्याच्या जागेची साफसफाई केली. परिसरातील कचरा, प्लास्टिक व पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना स्वच्छतेची शपथ तसेच नशामुक्त भारताची शपथ देण्यात आली. ‘चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान’ हा संदेश देत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. बस स्थानक हे हजारो प्रवाशांची वर्दळ असलेले ठिकाण असल्याने येथे स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. प्रवासी, व्यावसायिक व नागरिकांनी कचरा इतस्ततः न टाकता कचराकुंडीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी लायन्स क्लबचे पदाधिकारी तसेच अमळनेर नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, प्रभाग मुकादम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ हे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून, ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या संकल्पनेतून नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *