
‘मेघदूत’ महाकवी कालिदासाच्या उत्कट प्रतिभेचा अविष्कार : दिनेश नाईक
अमळनेर (प्रतिनिधी) प्राचीन भारतीय साहित्य परंपरेत संस्कृत साहित्याचे योगदान अनन्यसाधारण असून, महाकवी कालिदास यांनी आपल्या साहित्यकृतींमधून भारतीय संस्कृतीला अमूल्य ठेवा दिला आहे. ‘मेघदूत’ हे महाकाव्य महाकवी कालिदास यांच्या उत्कट प्रतिभेचा अविष्कार आहे, असे प्रतिपादन साहित्य भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश नाईक यांनी केले.
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालयात महाकवी कालिदास दिनानिमित्त ‘महाकवी कालिदास : जीवन व कार्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एम. कोळी होते. कार्यक्रमाचे आयोजन साहित्य भारती, अमळनेर शाखेच्या वतीने करण्यात आले. आपल्या व्याख्यानात दिनेश नाईक यांनी सांगितले की, महाकवी कालिदास यांनी कठोर साधनेतून ज्ञान व विलक्षण प्रतिभा प्राप्त केली. त्यांच्या साहित्यामध्ये निसर्ग, पर्वत, नद्या, तत्कालीन समाजजीवन, प्रेम, शृंगार आणि मानवी भावभावनांचे अत्यंत जिवंत व प्रभावी चित्रण आढळते. सोपी शब्दरचना आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी जगभरातील वाचकांना भुरळ घातली. त्यांच्या साहित्याचे अनेक जागतिक भाषांमध्ये भाषांतर झाले असून, दोन महाकाव्ये, दोन खंडकाव्ये आणि तीन नाटके अशा सात अजरामर साहित्यकृती त्यांनी निर्माण केल्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबतच विविध विषयांचे वाचन करून ज्ञानसमृद्ध जीवन घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. नरेंद्र सोनवणे यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य पी. एम. कोळी यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. वाचन, लेखन आणि संवादकौशल्ये आधुनिक जीवनात अत्यंत आवश्यक असल्याने ती आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न करावेत, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनिल वाघ यांनी मानले. यावेळी साहित्य भारतीचे विवेक जोशी, मंगेश काळकर, सारंग गर्गे, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply