अमळनेर पालिकेच्या धडक कारवाईत थकबाकीदार १६ दुकाने केली सील

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपरिषदेकडून शहरातील विविध शॉपिंग कॉम्प्लेक्समधील थकबाकीदार गाळेधारकांवर शुक्रवारी  धडक कारवाई करण्यात आली. यात १६ दुकाने सील करण्यात आली. यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नगरपरिषद प्रशासनाने हशिमजी प्रेमजी मार्केट, आय.यू.डी.पी. मार्केट, साने गुरुजी मार्केट, लालबहादूर शास्त्री मार्केट तसेच संत सखाराम महाराज मार्केट येथे तपासणी मोहीम राबवली. या ठिकाणच्या काही गाळेधारकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याचे आढळून आल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलत संबंधित दुकाने सील केली. ही कारवाई मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशान्वये करण्यात आली. या मोहिमेत कर अधीक्षक अनिल बोरसे, कर निरीक्षक लौकिक समशेर, मिळकत विभागातील विजय बागुल, मनोज सोनार तसेच वसुली विभागातील सचिन कदम यांच्या पथकाने सहभाग घेतला. नगरपरिषदेकडून थकबाकीदार गाळेधारकांना देयके भरण्याबाबत यापूर्वी अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यास प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच इतर थकबाकीदारांनी तातडीने देयके भरावीत, अन्यथा अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेकडून देण्यात आला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *