
वडापाव गाडीवर धिंगाणा; तरुणाच्या गळ्यातील चांदीची चैन हिसकावली, तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) येथील गंगाघाट परिसरातील वडापाव गाडीवर येऊन धिंगाणा घालत एका तरुणाच्या गळ्यातील सुमारे १५०० रुपये किमतीची चांदीची चैन हिसकावून नेल्याची घटना ६ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गणेश प्रवीण पवार, रा. कुलगुरू मंगल कार्यालयामागे यांनी फिर्याद दिली. त्यांचा भाऊ शिवम पवार याची गंगाघाट येथे ‘किंग वडा पाव’ नावाची गाडी आहे. फिर्यादीनुसार, ६ मे रोजी सायंकाळी गौरव कैलास सोनार आणि हर्षल बागुल उर्फ बंटी शिंपी हे दोघे मोटारसायकलवर तेथे आले. त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत मोटारसायकलची रेस करून परिसरात गोंधळ घातला. काही वेळानंतर तेथून निघून गेल्यानंतर शिवम पवार यांनी गौरव सोनारच्या वडिलांकडे मुलाच्या वर्तनाबाबत तक्रार केली आणि त्यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनला जाण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर काही वेळातच गौरव सोनार, हर्षल बागुल उर्फ बंटी शिंपी आणि दीपेश उर्फ बंटी महाजन हे तिघे पुन्हा मोटारसायकलवरून वडापाव गाडीवर आले. यावेळी गणेश पवार यांनी प्रकाराचा व्हिडीओ काढण्यासाठी मोबाईल सुरू केला असता, “व्हिडीओ का काढतो?” असे म्हणत आरोपींनी त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. गौरव सोनार याने गणेश यांची गचांडी पकडून “तुमच्या दुकानाचे नाव किंग वडा पाव आहे म्हणून तुम्ही बादशहा झाला का?” असे म्हणत धमकी दिली. तसेच “आम्ही अमळनेरचे बाप आहोत, कट्ट्याने तुमचा गेम करून टाकू,” अशी धमकी देत गळ्यातील सुमारे तीन भार वजनाची १५०० रुपये किमतीची चांदीची चैन हिसकावून तिघे पसार झाले. या प्रकरणी गणेश पवार यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११९(१), ३५२, ३५१(२) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply