
दृष्टी नसली तरी सुरांचा प्रकाश झळकला; अंधजन कल्याण मंडळाची चॅरिटी संगीत मैफिल ‘सुपरहिट’
अमळनेर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अंधजन कल्याण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेली भव्य चॅरिटी संगीत मैफिल रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी नाट्यगृह, स्टेशन रोड येथे शनिवारी, दि. १५ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांना तब्बल साडेचार तास मंत्रमुग्ध करून ठेवले. दृष्टिदिव्यांग कलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून उपस्थितांच्या मनावर अधिराज्य गाजवत कार्यक्रमाला ‘सुपरहिट’ ठरविले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सर्व कलाकार हे दृष्टिदिव्यांग तसेच शासकीय सेवेत कार्यरत होते. सप्तस्वरांजली म्युझिकल ग्रुपच्या कलाकारांनी देशभक्तीपर, मराठी, हिंदी तसेच अहिराणी सदाबहार गीतांची बहारदार मैफल सादर केली. एकापेक्षा एक सरस गीतांच्या सादरीकरणामुळे रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना भरभरून दाद दिली.
कार्यक्रमादरम्यान प्रत्येक गाण्यानंतर उपस्थित मान्यवरांकडून कलाकारांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. अंध कलाकारांच्या कला, कौशल्य, जिद्द आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. सुरेल गायनासह कलाकारांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. या सामाजिक उपक्रमाला अमळनेर नगरपरिषद, जयनिल फाऊंडेशन, श्री मंगळग्रह सेवा संस्था, छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, कुसुमाई बिझिनेस ग्रुप, जळगाव जनता सहकारी बँक, दृष्टी फाऊंडेशन (पुणे), मोहिनी ब्रास बँड, जिनवश्री रक्तपेढी (अमळनेर), लायन्स क्लब अमळनेर तसेच अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ यांच्यासह विविध संस्था, उद्योजक, व्यापारी आणि मान्यवरांनी भरीव आर्थिक सहकार्य केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. विशेष म्हणजे या मैफिलीस असंख्य दृष्टिदिव्यांग बांधव आणि भगिनी आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान काही दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची अर्थपूर्ण जोड मिळाली. चॅरिटी शोमधून प्राप्त होणारा निधी दृष्टिदिव्यांग बांधवांच्या शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि विविध सामाजिक कल्याणकारी उपक्रमांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. अंधजन कल्याण मंडळाच्या या उपक्रमाने मनोरंजनासोबतच सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित रसिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांना भविष्यातही भरभरून पाठिंबा देण्याची भावना व्यक्त केली.

Leave a Reply