
एसएनए स्पर्श प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमळनेर येथे प्रशिक्षण
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील केंद्र समन्वयक, जिल्हा परिषद, नगर परिषद व शासकीय आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, साधन व्यक्ती, अपंग समावेशित शिक्षण तालुका समन्वयक व विशेष शिक्षकांसाठी एसएनए स्पर्श प्रणाली हाताळणी प्रशिक्षण अमळनेर येथे संपन्न झाले. पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी आय.एम.ए. हॉल, जी.एस. हायस्कूल, अमळनेर येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे व शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रशिक्षणात जिल्हा परिषद, जळगाव येथील वरिष्ठ लेखा सहाय्यक पद्माकर वाणी यांनी एल.सी.डी. प्रक्षेपकाच्या माध्यमातून एसएनए स्पर्श प्रणालीची प्रत्यक्ष ऑनलाइन प्रक्रिया व कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सहभागींच्या विविध शंकांचे निरसन केले. गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी प्रास्ताविकातून एसएनए स्पर्श प्रणाली आणि मुख्याध्यापकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर केंद्र समन्वयक किरण शिसोदे यांनी आभार मानले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी तालुका वरिष्ठ लेखा सहाय्यक विजय बारी, सर्व तंत्रस्नेही शिक्षक, साधन व्यक्ती, अपंग समावेशित शिक्षण तालुका समन्वयक व विशेष शिक्षक यांनी सहकार्य केले.

Leave a Reply