मंगरूळ येथे भीषण अपघात; चारचाकीच्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

अमळनेर (प्रतिनिधी) धुळ्याकडून भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १ मे रोजी सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास मंगरूळ येथे एमआयडीसी पेट्रोल पंपासमोर घडली. या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आतिक हनिफ बागवान (रा. कोष्टीवाडा, अमळनेर) हे त्यांच्या मोटरसायकल (क्रमांक एमएच १९ यू ८६१६) वरून धुळे दिशेने जात होते. मंगरूळ येथील पेट्रोल पंपासमोर ते थांबले असताना धुळ्याकडून येणाऱ्या चारचाकी (एमएच ०४ केएल ५००७ ) वाहनाच्या चालकाने वेगावर नियंत्रण न ठेवता त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत आतिक बागवान हे मोटरसायकलसह रस्त्यावर दूर फेकले गेले. अपघात इतका भीषण होता की, संबंधित चारचाकी वाहन सुमारे ५० फूट अंतरावर जाऊन पलट्या खात रस्त्याच्या पलीकडे घरांसमोर जाऊन कोसळले. या घटनेत आतिक यांच्या डोक्याला, पायाला व कमरेला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली व जखमी आतिक बागवान यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. दरम्यान, जखमीचा भाऊ हाशिम हनिफ बागवान यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संबंधित चारचाकी चालकाविरोधात मोटार वाहन कायदा कलम १३४ (ब), १८४ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), १२५ (ब) व २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांनी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *