
गोठा शेड मजुरीसाठी ‘५ हजार द्या, मगच पैसे मिळतील’ ?
पिंपळे बुद्रुक येथील शेतकरी व मजुरांचा गंभीर आरोप; मानधन रखडल्याने संताप

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळे बुद्रुक येथे ‘जलतारे’ व ‘गोठा शेड’ योजनेंतर्गत काम केलेल्या कुशल व अकुशल कामगारांचे मानधन अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे थकीत मानधन मिळवून देण्यासाठी पंचायत समिती स्तरावरील संबंधित अभियंते व रोजगार सेवकांकडून प्रत्येक गोठ्यामागे किमान पाच हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार स्थानिक शेतकरी व मजुरांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील संजय चुडामन चौधरी, संतोष बापू चौधरी, राजेंद्र ताराचंद पाटील आणि युवराज पाटील या शेतकऱ्यांची जलतारे व गोठा शेडची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, प्रत्येक शेतकऱ्यांचे सुमारे ७० हजार रुपये मजुरीचे बिल प्रलंबित असून काम पूर्ण होऊनही संबंधित मजुरांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गोठा मंजूर करून देण्यासाठी यापूर्वीच काही अधिकाऱ्यांनी पैसे घेतले होते. आता प्रत्यक्ष मजुरीची रक्कम काढण्यासाठी पुन्हा पाच हजार रुपयांची मागणी होत असल्याने शेतकरी व मजुरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, कडक उन्हात दिवसभर मेहनत करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांना हक्काची मजुरी न मिळाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. रखडलेल्या मानधनामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी, संबंधित भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करून मजुरांचे मानधन त्वरित अदा करावे, अशी मागणी शेतकरी व मजुरांकडून करण्यात आली आहे. अन्यथा या प्रकरणाची अधिकृत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात येईल, असा इशाराही पीडितांनी दिला आहे.

Leave a Reply