
अंध कलाकारांची सुरेल देशभक्तीपर मैफल आज; अंधजन कल्याण मंडळाच्या चॅरिटी शोसाठी अमळनेर सज्ज
अमळनेर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दृष्टिदिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि अंध बांधवांच्या सामाजिक उन्नतीसाठी निधी उभारला जावा या उद्देशाने अंधजन कल्याण मंडळाच्या वतीने आज, १५ ऑगस्ट रोजी भव्य चॅरिटी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमात दृष्टिदिव्यांग कलाकार अमळनेरकरांना देशभक्ती, संगीत आणि समाजसेवेचा अनोखा संगम अनुभवायला देणार आहेत.
या मैफिलीचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व कलाकार दृष्टिहीन असून शासकीय सेवेत कार्यरत आहेत. आपल्या अंध बांधवांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी नाट्यगृह, स्टेशन रोड, अमळनेर येथे होणार आहे. सप्तस्वरांजली म्युझिकल ग्रुपच्या वतीने देशभक्तीपर, मराठी, हिंदी तसेच अहिराणी सदाबहार गीतांची बहारदार मैफल सादर करण्यात येणार आहे. दृष्टिदिव्यांग कलाकारांच्या कला, कौशल्य आणि स्वयोरोजगार करणाऱ्या अंध व्यक्तींच्या स्वावलंबनाला चालना देणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या चॅरिटी शोमधून प्राप्त होणारा निधी दृष्टिदिव्यांग बांधवांचे शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, स्वयोरोजगार तसेच विविध सामाजिक कल्याणकारी उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे. या सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमात नागरिक, उद्योजक, व्यापारी, सामाजिक संस्था तसेच दानशूर व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे तिकीट शुल्क केवळ १०० रुपये ठेवण्यात आले असून नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून दृष्टिदिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना दाद द्यावी आणि त्यांच्या कार्याला हातभार लावावा, असे आवाहन अंधजन कल्याण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply