
निर्माल्यामुळे कृत्रिम तलावाची दुरवस्था; पालिकेचे बॅनरही तलावात
नागरिकांकडून निर्माल्य टाकले जात असताना कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष; पडदेही झाले खराब
अमळनेर (प्रतिनिधी )गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी अमळनेर नगर परिषदेतर्फे तेल्या देव परिसरात कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांच्या सोयीसाठी मंडप, आडोसे, पडदे, बॅनर तसेच अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. तलावाच्या देखरेखीसाठी संबंधित मुकादम व कर्मचाऱ्यांच्या ड्युट्याही लावण्यात आल्या होत्या.
मात्र, गणेश विसर्जनानंतर या कृत्रिम तलावाची पाहणी केली असता तलावात मोठ्या प्रमाणात निर्माल्य साचल्याचे, तसेच नगर परिषदेचे बॅनरही तलावात पडल्याचे चित्र दिसून आले. नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या आडोशाचे पडदेही खराब झाल्याचे दिसत आहे.
नागरिकांकडून निर्माल्य तलावात टाकले जात असताना त्यांना रोखणे, निर्माल्य संकलनासाठी करण्यात आलेल्या स्वतंत्र व्यवस्थेची माहिती देणे तसेच परिसराची स्वच्छता आणि उपलब्ध साहित्याची निगा राखणे ही ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची जबाबदारी होती. मात्र, या व्यवस्थेकडे पुरेसे लक्ष देण्यात आले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नगर परिषद प्रशासनाने गणेश विसर्जनासाठी नियोजन करून सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी त्या सुविधांची देखभालच योग्य पद्धतीने झाली नसेल तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. विशेषतः ड्युटीवर नियुक्त कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी परिसराची पाहणी करून निर्माल्य तलावात जाणार नाही आणि मंडप, पडदे व बॅनर सुरक्षित राहतील याची काळजी घेणे अपेक्षित होते.
दरम्यान, नागरिकांनीही निर्माल्य कृत्रिम तलावात न टाकता त्यासाठी करण्यात आलेल्या स्वतंत्र व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नगर परिषद प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यपालनाची चौकशी करून निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विसर्जनानंतर तलावाची तातडीने स्वच्छता करून परिसरातील पडदे, बॅनर व अन्य साहित्य व्यवस्थित करण्याची गरज असून, भविष्यात अशा व्यवस्थेची देखरेख अधिक प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply