तालुक्यात आगींचे सत्र; ऊस, मका, ठिबक नळ्या व चारा जळून सुमारे तीन लाखांचे नुकसान

अमळनेर (प्रतिनिधी )तालुक्यातील मुडी, दहिवद आणि झाडी येथे विविध कारणांमुळे आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत ऊस, मका, ठिबक नळ्या, चारा तसेच इतर शेती साहित्य जळून खाक झाले असून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तालुक्यातील मुडी येथील योगराज राजेश संदानशीव यांच्या बोदर्डे शिवारातील गट क्रमांक ४१ मधील शेताजवळ शेजारील शेतात गवताला लावलेली आग पसरल्याने त्यांच्या अर्धा बिघा ऊस क्षेत्राला आग लागली. मुलगा कुणाल व मित्र दीपक चौगुले यांच्या मदतीने विहिरीचे पाणी मारून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत अंदाजे १५० ते २०० क्विंटल ऊस जळून खाक झाला होता. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून हेडकॉन्स्टेबल प्रवीण पारधी तपास करीत आहेत.

दरम्यान, गडखांब येथील गुलाब विठ्ठल पाटील यांच्या दहिवद शिवारातील गट क्रमांक ११५८ मधील शेतात विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्याने मक्याच्या शेताला आग लागली. शेतात काढून ठेवलेला मका, चारा तसेच ठिबक सिंचनाच्या नळ्या आगीत जळून खाक झाल्या. यात अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. अमळनेर पोलीस स्टेशनला याची नोंद करण्यात आली असून हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील तपास करीत आहेत.

तसेच झाडी येथील भगवान गोविंदा पाटील यांच्या घराशेजारी भरून ठेवलेल्या चारा कुट्टीला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीत चारा, लाकडे व पत्रे जळून नुकसान झाले. वारा सुरू असल्याने आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. आग पुढे पसरू नये म्हणून जेसीबीच्या सहाय्याने संपर्क तोडण्यात आला. अग्निशमन दलाचे जफर पठाण, दिनेश बिऱ्हाडे व मच्छींद्र चौधरी यांनी तत्परतेने कार्यवाही केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *