
कळमसरेतील बियर शॉपी फोडून ३६ हजारांचा मुद्देमाल लंपास
अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील कळमसरे येथे अज्ञात चोरट्याने बियर शॉपीचे कुलूप तोडून रोख रक्कम, सीसीटीव्हीचा डीव्हीआर तसेच बियरचे बॉक्स लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राजेंद्र रघुनाथ चौधरी (रा. कळमसरे) हे २५ जून रोजी सकाळी त्यांच्या मालकीची ‘राधिका बियर शॉपी’ उघडण्यासाठी गेले असता शटरचे दोन्ही कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता काउंटरमधील १३ हजार ५०० रुपये रोख रक्कम, सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर, बियरचे १२० टिन आणि २४ बॉटल असा एकूण ३६ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे आढळून आले.
या प्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार शरीफ पठाण करीत आहेत.

Leave a Reply